अंदमान व निकोबारमधील सागराखाली उभारण्यात आलेल्या ‘ऑप्टिकल फायबर प्रोजेक्ट’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. यामुळे अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील ब्रॉडबँड सेवेचा वेग वाढणार आहे.
३० डिसेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी २३१२ कि.मी. अंतराच्या सागरांतर्गत ऑप्टिकल फायबर प्रोजेक्टची पायाभरणी केली होती. त्यामुळे चेन्नई, अंदमान व निकोबर बेटे एकमेकांशी इंटरनेटने जोडली जाणार आहेत. चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर ते लिट्ल अंदमान, पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप या प्रमाणे इंटरनेट सेवा जोडली जाणार असून अंदमान निकोबार भागात आजपासून इंटरनेट सेवा मोठय़ा प्रमाणात सुरू झाली आहे.
१२२४ कोटींचा हा प्रकल्प असून पोर्ट ब्लेअरशिवाय स्वराज द्वीप (हॅवलॉक) लाँग आयलंड,रंगाट, लिटल अंदमान,कमोरटा, कार निकोबार व ग्रेटर निकोबार ही ठिकाणे जोडली जाणार आहेत.
पंतप्रधानांनी सांगितले, आधुनिक दूरसंचार जोडणीचा फायदा अंदमान व निकोबार बेटांना होईल. देशातील सर्व दूरसंचार पुरवठादार कंपन्या तेथे सेवा देऊ शकतील. ऑप्टिकल फायबरने अंदमान निकोबारला इतर देशांशी इंटरनेटने जोडण्याची सोय मिळणार आहे. पोर्ट ब्लेअरला इंटरनेटचा वेग सेकंदाला ४०० गिगॅबाइट असून इतर बेटांवर इंटरनेटचा वेग सेकंदाला २०० जीबी आहे.
अंदमान बेटे व चेन्नई यांना ऑप्टिकल फायबरने जोडले असून वेळेआधीच हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. भूमिगत केबल टाकण्याचे काम बीएसएनएलने चोवीस महिन्यात केले आहे. या प्रकल्पामुळे ४ जी सेवा, दूर शिक्षण, दूर वैद्यक, दूर प्रशासन या सेवा मिळणार आहेत. यामुळे या बेटांवरील लाखो मुलांना शिक्षणाची सोय मिळणार असून त्यांचा मोबाइल व इंटरनेटचा प्रश्न सोडवला आहे.
पोर्ट ब्लेअर विमानतळावरून १२०० प्रवासी ये-जा करू शकतात. दिगलीपूर, कार निकोबर, कॅम्बबेल बे येथे विमानतळ सेवा देण्यात येत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ग्रेट निकोबार येथे १० हजार कोटींचे ट्रान्सशीपमेंट बंदर उभारण्याचा प्रस्ताव असून स्वराज द्वीप, शहीद द्वीप व लाँग आयलंड यासह काही ठिकाणी एरोड्रोम सुविधा देण्यात येणार असून कोची शिपयार्ड बेटांवरील वाहतूक वाढवण्यासाठी चार जहाजे देणार आहे.
No comments:
Post a Comment