🔰दशातील ३७ सार्वजनिक कंपन्यांनी सामाजिक दायित्व म्हणून ‘पीएम केअर्स फंड’मध्ये १९०० कोटींचे भरीव योगदान दिले आहे.
🔰करोना उद्रेकाच्या पाश्र्वभूमीवर २८ मार्चला ‘पीएम केअर्स फंड’ची स्थापना करण्यात आली. ‘पीएम केअर्स फंडा’तील योगदानाचा तपशील माहिती अधिकार कायद्याद्वारे देता येणार नसल्याचे १८ मे रोजी पंतप्रधान कार्यालयाने म्हटले होते. मात्र, कंपन्यांकडून ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला माहितीच्या अधिकारात मिळालेल्या तपशीलानुसार, ३१ मार्च २०२० अखेर ‘पीएम केअर्स फंड’मध्ये ३,०७६.६२ कोटी रुपये जमा झाले होते. त्यातील ३०७५.८५ कोटी रूपयांच्या देणग्या हे ‘स्वयंस्फूर्त योगदान’ होते.
🔰५० सार्वजनिक कंपन्यांकडून माहिती अधिकारात तपशील मागवण्यात आला होता. त्यास ३७ कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कंपन्यांनी गेल्या पाच महिन्यांत ‘पीएम केअर्स फंड’ला १९०५.३८ कोटी रूपये दिले. त्यातील काही कंपन्यांनी २०१९-२०२० या आर्थिक वर्षांतील अखर्चित सामाजिक दायित्व निधी या फंडासाठी दिला. काही कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षांसाठी सामाजिक दायित्व निधीची तरतूद निश्चित करण्याआधीच रक्कम ‘पीएम केअर्स फंड’मध्ये जमा केली. एका कंपनीने तर सामाजिक दायित्व निधीच्या तरतुदीपेक्षा अधिक रकमेचे योगदान दिले.
🔰‘पीएम केअर्स फंड’मध्ये योगदान देणाऱ्या ३७ कंपन्यांमध्ये तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) आघाडीवर असून, त्यांनी तीनशे कोटी रूपये दिले आहेत. २०२०-२१ या वर्षांसाठी सामाजिक दायित्व निधीची तरतूद ठरलेली नसताना रक्कम दिल्याची कबुली ‘ओएनजीसी’ने दिली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड म्हणजे ‘एचपीसीएल’नेही २०२०-२१ साठीची तरतूद निश्चित नसताना आधीच १२० कोटी रुपये ‘पीएम केअर्स फंड’मध्ये दिले आहेत. ‘दी पॉवर फायनान्स कार्पोरेशन’ने २०२०-२१ मधील सामाजिक दायित्व निधी तरतुदीपेक्षा अधिक रक्कम म्हणजे २०० कोटी रुपये दिले आहेत.
No comments:
Post a Comment