Friday, 3 March 2023

कर्मवीर भाऊराव पाटील



बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आणि वटवृक्ष-रूप धारण केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक!

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहीरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.


पुढील काळात ते सातार्‍यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मद्वान्नामास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदी मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातीधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.


दिनांक ४ ऑक्टोबर, १९१९ रोजी कर्मवीरांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही उद्दिष्टे होती -

मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना शक्यतो मोफत शिक्षण देणे.
निरनिराळ्या जातीधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.
संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान, उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल, तेव्हा संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी आयुष्यभर अमाप कष्ट केले. केवळ क्रमिक शिक्षण नव्हे तर, समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.


सातार्‍यात त्यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांना आपल्या पत्नीचे दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. १६ जून, १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली सातार्‍यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.


भाऊरावांनी देशातलं ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वानुसार चालणारे पहिले ‘फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. १९४७ साली कर्मवीरांनी सातार्‍यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर १९५४ साली कर्‍हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली.  शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची वानवा पडू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावानं ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे कर्मवीरांच्या डोळ्यासामेर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.


१९५९ साली त्यांना पुणे विद्यापीठाकडून ‘डी.लिट्’ पदवी बहाल करण्यात आली. भारत सरकारनेही ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. श्री. ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृती भवन - यांच्या माध्यमातून कर्मवीरांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या -शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणार्‍या- आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, १९५९ रोजी मालवली.

No comments:

Post a Comment