सुकी, अनेर आणि मांजल या तीन नद्या आणि त्यांना मिळणारे छोटे मोठे नाले यामुळे यावल अभयारण्याचे क्षेत्र हिरवेगार आणि जैवविविधतेने समृद्ध झाले आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या अस्तित्त्वाने संपन्न असलेल्या या अभयारण्याची घोषणा शासनाने 21 फेब्रुवारी 1969 रोजी केली.
वनपर्यटनाचा मनमुराद आनंद घेणाऱ्यांसाठी हे क्षेत्र अतिशय सुंदर असून ज्यांना वन्यजीव पहायचे आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना पक्षी पहायचे आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना वाघ पहायचा आहे त्यांच्यासाठीही हे अभयारण्य एक आकर्षणाचे ठिकाण आहे. अनेर आणि सुकी धरणाच्या आसऱ्याला वन्यजीव येतात. रानपिंगळ्याबरोबर गरूड, सुतार या पक्ष्यांसह 200 हून अधिक प्रजातींचे पक्षी आपण येथे पाहू शकतो. पट्टेदार वाघाचा वावर आणि बिबट्याचे होणारे दर्शन अंगावर रोमांच उभे करतात. अस्वल, कोल्हा, लांडगा, रानकुत्रा, रानडुक्कर, रानमांजर, चिंकारा, हरिण, चितळ, चौशिंग्या, सांबर आणि नीलगायीही आपल्याला नजरेस पडतात. साग, अंजनासोबत ऐन, शिसव, तिवस, खैर, हिरडा, बेहडा, तंदूच्या झाडांची गर्दी मनाला सुखावून जाते. या वनामध्ये बांबूही मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
No comments:
Post a Comment