Sunday, 12 December 2021

पहिले वृत्तपत्र म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचे "दर्पण' पत्र ओळखले जाते.



🅾वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1832च्या प्रारंभी त्यांनी मुंबईतून हे वृत्तपत्र सुरू केले. पितामह दादाभाई नौरोजी यांच्यासारख्या थोर पुरुषांचे ते गुरू होत. न्या. ना. ग. चंदावरकरांनी त्यांचा पश्‍चिम भारतातील "आद्य ऋषी' असा त्यांचा सार्थ गौरव केला होता.

🅾"दर्पण'चा पहिला अंक शुक्रवार, दि. 6 जानेवारी 1832 रोजी प्रसिद्ध झाला. पहिले काही महिने हे पत्र पाक्षिकच होते. 4 मे 1832च्या अंकापासून ते साप्ताहिक स्वरूपात निघू लागले. हे वृत्तपत्र आठ पानी होते व त्यात पानातील दोन स्तंभांपैकी डावीकडच्या स्तंभात इंग्रजी मजकूर व समोर उजवीकडील स्तंभात त्याचे मराठी भाषांतर असे. गंमत म्हणजे दर्पणच्या अंकाला "कागद' असे म्हटले जात असे.

🅾 तसा उल्लेख खुद्द बाळशास्त्री करीत असत. त्या काळी कोणत्याही वृत्तपत्राचा खप 300-400 प्रती याच्या पुढे नसे. वर्षभरातच दर्पणने 300ची मजल गाठली होती. हे पत्र सुमारे साडेआठ वर्षे चालले. 26 जून 1840 रोजी शेवटचा अंक प्रसिद्ध होऊन ते बंद पडले.

🅾"दर्पण'ची ओळख आद्य मराठी पत्र अशी असली, तरी त्याच्या अगोदर एक मराठी वृत्तपत्र अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळतो. त्या वृत्तपत्राचे नाव "मुंबापूर वर्तमान' असे होते. रविवार, दि. 20 जुलै 1828 रोजी त्याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला होता.

🅾 या पत्राच्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झालेला एक "विक्षिप्त' यांचा लेख "बॉम्बे गॅझेट' या मुंबईतील इंग्रजी पत्राने आपल्या 23 जुलै 1828 च्या अंकात प्रसिद्ध केला होता. लंडन येथे निघणाऱ्या "एशियाटिक जर्नल ऍण्ड मंथली रजिस्टर (फॉर इंडिया ऍण्ड इट्‌स डिपेन्डन्सीज)' या मासिकाच्या फेब्रुवारी 1829च्या अंकात "महरट्टा न्यूजपेपर' या मथळ्याच्या वृत्तात "मुंबापूर वर्तमान' या पत्राचा उल्लेख होता.

🅾हे वृत्त "दी बॉम्बे गॅझेट' या पत्राच्या 23 जुलै 1828 च्या अंकावरून घेतल्याचाही उल्लेख एशियाटिक जर्नलमध्ये होता. "बॉम्बे गॅझेट' मध्ये 9 जुलै 1828च्या अंकात या पत्राची इंग्रजी व मराठी जाहिरातही प्रसिद्ध झाली होती. परंतु या पत्राचे चालक, संपादक, प्रकाशक कोण होते, ते किती काळ चालले याची काहीच माहिती उपलब्ध नाही. एक मात्र खरे की ते 20 जुलै 1828 रोजी सुरू झाले. यावरून "मुंबई वर्तमान' हेच मराठीतील आद्य वृत्तपत्र असे म्हणता येईल.

🅾पण त्यातही एक गोची अशी, की "बॉम्बे गॅझेट'च्या प्रास्ताविकात "एक नवीन मराठी वर्तमान पत्र' असा उल्लेख आहे. याचा अर्थ त्यापूर्वी एखादे पत्र निघत होते की काय, अशी शंका "मराठी वृत्तपत्रांचा इतिहास'कर्ते रा. के. लेले यांनी व्यक्त केली आहे.

🅾परंतु कालानुक्रमे "दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र म्हणता आले नाही, तरी मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान "दर्पण'कडेच जातो, असा लेले यांचा अभिप्राय आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...