Tuesday, 14 July 2020

राजे उमाजी नाईक

(जन्म: ७ सप्टेंबर १७९१ - मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक होते

आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक [खोमणे]
जन्म:
सप्टेंबर ७, १७९१
किल्ले पुरंदर,भिवडी, पुणे, ब्रिटिश भारत
मृत्यू:
फेब्रुवारी ३, १८३२
खडकमाळ आळी , पुणे, ब्रिटिश भारत
चळवळ:
भारतीय स्वातंत्र्यलढा
धर्म:
हिंदू (रामोशी)
वडील:
दादोजी खोमणे
आई:
लक्ष्मीबाई

■भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरले गेले.ते म्हणजे 'राजे उमाजी नाईक'.

■३ फेब्रुवारीहा या आद्यक्रांतिकाराचा स्मृतिदिन. रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे, राजे उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे.पण सर्व जाती-धर्माँनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

■क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्मातील लोकांनी केले पाहिजे.मग हे राजे उमाजी नाईक असे उपेक्षित का राहून गेले हे आश्चर्य आहे.. 'मरावे परि क्रांतिरूपे उरावे' अशी उक्ती आहे ती आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वतःच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी कॅप्टन रॉबर्टसन याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?" तर [ मॉकिनटॉस]म्हणतो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच भारताला स्वातंत्र्य लाभले असते.

°आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक

■उमाजीराजे नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे झाला.वडिल दादोजी खोमणे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते.त्यामुळे उमाजीराजेंचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजीराजे जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरे आणि करारी होते. त्यांनी पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. जसे उमाजीराजे मोठे होत गेले तसा त्यांनी वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचे व संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजीराजे बेभान झाले. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठोजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळसकर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.

■उमाजीराजे नाईक यांनी इंग्रज, सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर ते भावासारखा धावून जाऊ लागले. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीराजेंना सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्यांनी त्याकाळात तुरंगात लिहिणे वाचणे शिकले .या घटनेचे इंग्रज आधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस याने फार आश्चर्य व कौतुक केले.आणि तुरूंगातून सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्यांचा कारवाया आणखी वाढल्या. उमाजीराजे देशासाठी लढत असल्याने जनताही त्यांना साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजीराजेंना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिनटॉस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारासफर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीराजेंच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीराजेंचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका सैन्य तुकडीत जवळ जवळ ५ हजार सैनिक होते.

■इंग्रजांणसारख्या बलाढ्य शत्रुशी मुकाबला करायचा म्हणजे मोठे मणुष्यबळ असायला हवे .म्हणजेच सैन्य व प्रचंड खर्च आलाच.पण उद्देश महान असल्यामुळे ते साधनाअभावी थांबले नाहीत.ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानायचे असे खुद्द इंग्रज आधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस याने नमूद केले आहे. २४ फेब्रुवारी १८२४ ला उमाजीराजेंनी भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. २२ जुलै १८२६ साली आद्यक्रांतिकारक उमाजींचा राज्याभिषेक कडेपठार,जेजुरी या ठिकाणी करण्यातआला.त्यांनी छत्रचामर,अबदागीर,इ.राजचिन्हे धारण केली.दरबारात ते भिक्षुक-पुजारी यांना दक्षिणा व गोरगरिबांना दान देत असत.उमाजीराजेंनी विभागनिहाय सैन्य प्रमुख व त्यांच्या तुकड्या नेमून सर्व भागात तैनात केल्या होत्या आणि त्यांना कामे वाटून दिली होती. तसेच त्यांनी एकमेकांशी संपर्क,दळणवळण,इंग्रजांच्या बातम्या तसेच लोकांचा बातम्या,इ.कामासाठी हेरखातेही निर्माण केले होते.विभागनिहाय गुप्तहेरखाते नेमले होते.सैन्यात व गुप्तहेरखात्यात सर्व जाती-धर्माचे लोक होते. २८ ऑक्टोबर १८२६ साली उमाजीराजेंविरुद्ध इंग्रजांनी १ला जाहिरनामा प्रसिद्ध केला.त्यात उमाजीराजे व त्यांचा साथीदारांना पकडणाऱ्यास मोठ्या रकमेची बक्षिसे व इनाम जाहिर केले व या क्रांतिकारकांना मदत करणाऱ्यास शिक्षा जाहीर केली.पण जनतेने इंग्रजांना मदत केली नाही. यातून उमाजीराजेंची लोकप्रियता दिसून येते.अशाच प्रकारे २ रा जाहिरनामा इंग्रजांनी ८ ऑगस्ट १८२७ साली प्रसिद्ध केला.त्यात बक्षिसाची रक्कम वाढवली व शरण येणाऱ्यास माफी देण्याचे अभिवचन देण्यात आले.तरीही कोणीही मदत केली नाही.कारण लोक उमाजीराजेंना इंग्रजांविरुद्ध एक आशास्थान म्हणून पाहू लागले होते . २० डिसेंबर १८२७ साली उमाजीराजे व इंग्रजांच्या झालेल्या युद्धात इंग्रजांना पराभव पत्करावा लागला. उमाजीराजेंनी ५ इंग्रज सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले.कैप्टन डेव्हिस पासून ते लेफ्टनंट पर्यंत सर्वच लालबुंद झाले. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. इंग्रजांनी ३ रा जाहिरनामा उमाजीराजेंविरुद्ध प्रसिध्द करुन बक्षिसाची रक्कम दुप्पट केली.त्याचाही काही उपयोग झाला नाही. जंजिऱ्याचा सिद्दी नवाब याने उमाजीराजे कोकणात गेले असताना त्यांना मदत मागितली होती. २४ डिसेंबर १८३० ला उमाजीराजेंनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते आणि काहीचे प्राण घेतले. २६ जानेवारी १८३१ साली इंग्रजांनी ४ था जाहिरनामा प्रसिद्ध केला व त्यात उमाजीराजेंना पकडून देणाऱ्यास ५०००रुपये रोख बक्षिस व २००बिघे (१००एकर)जमीन जाहिर करण्यात आली.पण तरीही कोणीही इंग्रजांना मदत केली नाही.अशा प्रकारे उमाजीराजेंचा भारताचा स्वातंत्र्यासाठी असनाऱ्या लढ्यास सर्व राजे-रजवाडे,संस्थानिक,जनता पाठिंबा देत होते.

■उमाजीराजेंनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, "लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. सर्व राजे रजवाडे ,सरदार जमीनदार, वतनदार,देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी बंड पुकारावे आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये.असे करणाऱ्यास नवीन सरकारमधून जहागिरी,इनामे वा रोख पैशाची बक्षीसे मिळतील.ज्यांची वंशपरंपरागत वतने,तनखे,इ.इंग्रज सरकारमुळे गेले असतील ती सर्व त्यांना परत केली जातील. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे व नवीन न्यायाधीष्ठीत राज्याची स्थापना होइल. इंग्रजांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल" असे सांगून उमाजीराजेंनी एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. संपुर्ण क्रांतिकारकांचा इतिहासात अशा प्रकारचा व्यापक जाहिरनामा प्रथमच दिसतो.हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पानच आहे.म्हणूनच उमाजीराजे हे आध्यक्रांतिकारक ठरतात. तेंव्हापासून उमाजी हे जनतेचे राजे बनले. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीराजेंना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली .इंग्रजांनी उमाजीराजेंविरुद्ध ५वा जाहिरनामा प्रसिद्ध केला. माहिती देणाऱ्यास १० हजार रु
पये रोख आणि चारशे बिघे (200एकर) जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली.हा इनाम त्या काळात अगनित होता. त्र्यंबक चंद्रस कुलकर्णी हा फितूर झाला व याने उमाजींराजेंची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.

■१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीराजेंना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्यांना ३५ दिवस ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजीराजे असताना त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस दररोज महिनाभर त्यांची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीराजेंची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीराजेंवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर राजे उमाजी यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिले नरवीर उमाजीराजे नाईक ३ फेब्रुवारी १८३२ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४३ व्या वर्षी हसत हसत फासावर चढले.जीवंतपणी सतत ताठ राहिलेली मान जीव गेल्यानंतरच वाकली. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीराजेंचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीराजेंसोबत इंग्रजांनी त्यांचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.

■अशा या धाडसी उमाजीराजेंनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी उमाराजेंचे धोरण डोळ्यासमोर ठेवून ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड सुरू केले. त्यावेळी दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.त्यांचा लढा वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...