Monday 6 July 2020

राज्यावर अर्थसंकट


विषाणूमुळे तब्बल ३५ हजार कोटींचा तोटा; महसुलात मोठी घट
करोनाच्या साथीमुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने उद्योग-व्यापार उदीम, घरांची खरेदी-विक्री असे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्य सरकारच्या तिजोरीला करोनाचे चटके बसले असून मार्च २०१९ च्या तुलनेत यंदा मार्च मध्ये जवळपास २५ हजार कोटींचा फटका बसला.

- आर्थिक वर्षांचा विचार करता २०१९-२० मध्ये अपेक्षित महसुलापेक्षा सुमारे ३५ हजार कोटींचा फटका बसला आहे.
गेल्या आर्थिक वर्षांचा जमा-खर्चाचा तपशील आता मंत्रालयात मांडण्यात येत आहे. त्यानुसार महसुलात मोठी घट झाली आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीवरील मूल्यवर्धित कराच्या माध्यमातून ३८ हजार ६६ कोटी रुपयांची अपेक्षा होती. पण त्यात ४३६ कोटी रुपये कमी मिळाले.मुळात अर्थव्यवस्थेत थोडी मंदी असल्याने वस्तू व सेवा कराची वसुली कमी राहिली. त्यात करोनाच्या साथीमुळे आणखी फटका बसला. करोनामुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले. त्याचा मोठा परिणाम मार्चमधील महसुलावर झाला.
परिस्थिती काय?

* मार्च २०१९ मध्ये राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे ४२ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता.

-  यंदा उद्योग-व्यापार घरांची खरेदी-विक्री, उत्पादन शुल्क, इंधनावरील कर अशा सर्वच आघाडय़ांवरील महसूल आटला आणि मार्च २०२० मध्ये राज्याच्या तिजोरीला अवघे १७ हजार कोटी रुपये मिळाले.

-  म्हणजेच सुमारे २५ हजार कोटींचा फटका एकटय़ा मार्च महिन्यात आपल्याला बसला आहे. सरत्या आर्थिक वर्षांचा विचार केला तर सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला, अशी माहिती अर्थ विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
सारी अनिश्चितता.. वस्तू व सेवा करातून राज्याला २०१९-२० मध्ये १ लाख ३ हजार ७६० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता. प्रत्यक्षात त्यातून ८२ हजार ५९० कोटी रुपये मिळाले. हा २१ हजार १७० कोटी रुपयांचा फटका बसला.

-  अर्थात केंद्र सरकारकडून त्याची भरपाई अपेक्षित असली तरी ती कधी मिळेल हे याची सद्यस्थितीत खात्री देता येत नाही.

No comments:

Post a Comment