अतिशय देखणा, रंगीबेरंगी आणि आबालवृद्धांना अगदी क्षणात आपलेसे करणारा कीटक म्हणजे फुलपाखरू! आपल्या सौंदर्याची भुरळ सर्व मानवजातीला घालणारी फुलपाखरे जैवसाखळीतील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत.
२२ जून २०१५ या दिवशी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने अत्यंत सुंदर आणि आकाराने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘ब्लू मॉरमॉन’ (निलवंत; सोबतचे फुलपाखराचे चित्र पाहा) या फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरा’चा दर्जा प्रदान केला. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले!
फुलपाखरे दिसायला मोहक असली तरी त्यांना देण्यात आलेली इंग्रजी भाषेतील नावे सामान्यजनांच्या आकलनापलीकडे असतात. त्यांना फुलपाखरांविषयी आपलेपणा वाटावा, आत्मीयता वाटावी म्हणून ‘महाराष्ट्र जैवविविधता मंडळा’मार्फत फुलपाखरांचे मराठी नामकरण करण्यात आले आहे.
फुलपाखरांच्या सवयी, खाद्य वनस्पती, रंग, आकार, नक्षी आणि इंग्रजी नावाचे भाषांतर हे तपशील फुलपाखरांना मराठी नावे देताना विचारात घेतले गेले आहेत. सदर नावे आपल्या संस्कृतीशी निगडित, आपल्या मातीतील वाटावीत तसेच उच्चारण्यास, लक्षात ठेवण्यास सोपी असावीत यावरही कटाक्ष ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या एकूण २७४ प्रजातींबरोबरच त्यांच्या सहा कुळांनादेखील मराठमोळी नावे दिलेली आहेत.
उदाहरणार्थ, मुक्तपणे विहरणाऱ्या ‘वाँडरर’ या फुलपाखराला ‘विमुक्ता’, तर ‘प्लमजूडी’ नावाच्या फुलपाखराला ‘पिंगा’ ही नावे त्यांच्या सवयींना अनुसरून तर, ‘ग्रासज्वेल’ या फुलपाखराला ‘रत्नमाला’, ‘जेझबेल’ला ‘हळदीकुंकू’ ही नावे त्यांच्या दिसण्यावरून, ‘यामफ्लाय’ या फुलपाखराला ‘यामिनी’, ‘टायगर’ या गुजरातच्या राज्य फुलपाखराला ‘रुईकर’ ही नावे त्यांच्या खाद्य वनस्पतीवरून दिलेली आहेत.
‘ग्रास डेमॉन’ला ‘तृणासूर’, तर ‘रेडस्पॉट’ला ‘आरक्त बिंदू’ ही नावे भाषांतर म्हणून दिलेली आहेत. ‘लीफब्लू’ला ‘अनिता’, तर ‘क्यूपीड’ला ‘पांडव’ ही नावे त्यांच्या शास्त्रीय नावांवरून देण्यात आलेली आहेत. ‘कुंचलपाद (निम्फॅलिएड)’, ‘चपळ (हेस्पेरायडे)’, ‘निल (लायकेनिडे)’, ‘पितश्वेत (पायरिडे)’, ‘पुच्छ (पॅपिलिऑन्डे)’, ‘मुग्धपंखी (रिओडिनिडे)’ अशा सहा कुळांतील फुलपाखरांच्या मराठी नावांची सूची ‘महाराष्ट्रातील फुलपाखरांची मराठमोळी नावे’ या सचित्र माहितीपुस्तिकेत वाचायला मिळतील. अशा प्रकारे फुलपाखरांना मातृभाषेत नावे देणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य (केरळ पहिले) आहे.
No comments:
Post a Comment