Saturday, 20 June 2020

आम्लवर्षा म्हणजे काय

समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन तिचे ढग बनतात आणि त्या ढगांना थंड हवा मिळाली की त्या वाफेचे परत पाण्यात रूपांतर होऊन पावसाच्या रूपात ते जमिनीवर पडतं. समुद्राचं किंवा जमिनीवरच्या नद्या, नाले, तळी वगैरेंचं पाणी प्रदूषित झालेलं अस़तं. पण वाफ होऊन तिचं परत पाणी होतं तेव्हा ते सगळे प्रदूषण नाहीसे होऊन पावसाचं पाणी शुद्ध होतं, असं आपण लहानपणीच शिकलो. पण खरंच हे पाणी शुद्ध असतं का, असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर नाही असंच द्यावं लागेल. कारण हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन या वायूंबरोबरच इतरही वायू असतात. यातल्या कार्बन डायॉक्साईडची ढगातल्या बाष्पांशी प्रक्रिया होऊन तो वायू त्या पाण्यात विरघळतो. त्यापायी कार्बोनिक आम्ल तयार होऊन पावसाच्या पाण्याबरोबर तेही जमिनीवर उतरतं. त्यामुळे तथाकथित शुद्ध पावसाचे पाणीही थोडसं आम्लधर्मीय असतंच. पण अलीकडच्या काळात खनिज इंधनाच्या वाढत्या वापरामुळे सल्फर डायॉक्साईड व नायट्रसऑक्साइड यांसारखे वायूही वातावरणात साठून राहू लागले आहेत. तेही मग पावसाच्या पाण्यात विरघळतात. त्या अभिक्रियेपोटी सल्फ्युरिक व नायट्रिक आम्लाची निर्मिती होते. ही आम्लंही पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर उतरतात. या प्रकारच्या पावसाला आम्लवर्षा असं म्हटलं जातं.

ही झाली द्रवरूप आम्लवर्षा. पण काही वेळा हे वायू वार्‍याबरोबर वाहिले जाऊन इमारती किंवा झाडांवर उतरतात. तिथेच चिटकून राहतात. हीही एक प्रकारची आम्लवर्षाच म्हटली पाहिजे, कारण जेव्हा पावसाचं पाणी त्यांच्यावर पडतं, तेव्हा ते वायू त्या पाण्यात विरघळतात आणि ते पाणीही जमिनीवर उतरतं, नदीनाल्यांमधून वाहू लागतं.

आम्लधर्मियता मोजण्याचं एकक सामू आहे. शुद्ध पाणी आम्लधर्मीयही नसतं आणि अल्कलीधर्मीयही नसतं. ते उदासीन असतं. त्यामुळे त्याचा साम ७ एवढा असतो. पण त्यात थोडी जरी आम्लधर्मीया आली की तो घसरतो. कार्बोनिक आम्लापोटी पाण्याचा सामू ५.५ एवढा होतो. पण अलीकडच्या काळात तो ४.५ एवढा झाल्याचं दिसून आलं आहे. त्याला अर्थात त्यातील सल्फ्युरिक आणि नायट्रिक आम्ल कारणीभूत आहेत.

पावसाच्या या आम्लधर्मियतेचा सजीव आणि निर्जीव सृष्टीवर अनिष्ट परिणाम होत असतो. दगडी इमारतीही सततच्या आम्लवर्षावामुळं झिजतात, त्यातील धातूंना गंज चढतो. सजीव सृष्टी सृष्टीवर तर त्याचे अधिकच विपरीत परिणाम होत असतात. वनस्पती आम्लधर्मीय पाण्यामुळे मरून जातात. समुद्र किंवा नदीनाल्यांमधल्या माशांचीही तीच गत होते. असं आम्लवर्षाग्रस्त अन्न खाल्ल्यामुळे प्राण्यांवरही त्याचे अनिष्ट परिणाम होत असतात.

No comments:

Post a Comment