Wednesday, 3 June 2020

मुंबईत सहसा चक्रीवादळ का येत नाही माहिती आहे?


तामिळनाडू केरळ आणि समुद्र किनाऱ्यावरील राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा नेहमी बसतो. मग प्रश्न पडतो महाराष्ट्रालाही किनारपट्टी लाभली आहे. मग अशी वादळं मुंबईत किंवा कोकणात का येत नाहीत?
पर्यावरणतज्ज्ञ अभिजीत घोरपडे सांगतात की समुद्रावर सतत वादळं येत राहतात. तापमान, दाब, वाऱ्याच्या वेगावरून चक्रीवादळ तयार होणार की नाही, हे ठरतं. पण प्रत्येक वादळ चक्रीवादळात रूपांतर होणारच, असं नसतं.

घोरपडे सांगतात, "आपल्याकडे चक्रीवादळ तयार होण्यासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हावा लागतो. समुद्रातल्या तापमानवाढीमुळं समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्याची गती अधिक असते."

समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासाठी तापमानातील वाढ हा घटक सर्वाधिक कारणीभूत असतो. सागरात जेव्हा तापमानात वाढ होते तेव्हा तिथं कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेले असतो. त्याचदरम्यान वाऱ्याचा वेगही वाढतो.

कमी दाबाचा पट्टा, उच्च तापमान आणि जोरानं वाहणारं वारं, असं त्रिकूट मिळून मग चक्रीवादळाला जन्म देतं.

पण सगळीच वादळं बंगालच्या उपसागरात तयार होत नाहीत. बहुतेक चक्रीवादळं पॅसिफिक महासागरात तयार होतात आणि विषुववृत्तीय वाऱ्यांबरोबर वाहत भारत आणि श्रीलंकेच्या पूर्व किनारपट्टीवर धडक देतात.
भारताला पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी लाभली असली तरी चक्रीवादळं फक्त ओडीशा, आंध्रप्रदेश, तामिळनाडूतच येतात.

फक्त पूर्व किनाऱ्यावरील राज्यांनाच हे वादळं का धडकतात? गोवा, कर्नाटक किंवा महाराष्ट्राला का कधी अशी धोक्याची सूचना देण्यात येत नाही?

*पश्चिम किनारपट्टीवर का नाही?*
चक्रीवादळं तयार होण्यासाठी काही ठराविक परिस्थितीची आणि भौगोलिक रचनेची गरज असते.
मुंबई किंवा महाराष्ट्राला पश्चिम किनारपट्टी लाभली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. पण विषुववृत्तीय वारं पूर्वेकडून पश्चिमेकडं, म्हणजेच मुंबईकडून समुद्राकडं वाहतं. त्यामुळं आलेलं चक्रीवादळ पुढं सरकून गुजरातच्या किनारपट्टीवर आदळतं.
"याचं कारण उत्तर गोलार्धातील वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतात. त्यामुळं अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली तरी अशी वादळ मुंबईपासून दूर जातात,".
म्हणून कधीतरी गुजरातच्या किनारपट्टीवर अशी चक्रीवादळं धडकतात.

म्हणजेच बंगालच्या उपसागरात आलेली वादळं भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आदळतात तर अरबी समुद्रातील चक्रीवादळं गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर आदळतात.
वादळाच्या तीव्रतेनुसार त्यांची विभागणी केली जाते. जगातील बहुतेक चक्रीवादळं पूर्व किनारपट्ट्यांवर येत राहतात.
आणि जगाच्या ज्या भागात ते निर्माण होतात, त्यावरून त्यांची नावं आणि प्रकार ठरतात.

उत्तर अटलांटिक आणि इशान्य पॅसिफिक महासागरात आलेल्या चक्रीवादळाला 'हरिकेन' म्हणतात तर उत्तर पश्चिम किंवा वायव्य पॅसिफीक महासागरात येणाऱ्या चक्रीवादळाला 'टायफून' म्हणतात. आणखी एक प्रकार म्हणजे 'सायक्लोन' जे दक्षिण पॅसिफिक आणि भारतीय महासागरात येतात.

No comments:

Post a Comment