🌦 21 मे 2020 रोजी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पश्चिम घाटातल्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांबाबत अधिसूचना जाहीर करण्याच्या मुद्यांवर चर्चा केली.
🌦 या चर्चेदरम्यान पश्चिम घाटाचे महत्त्व लक्षात घेता या घाटाचे संरक्षण करण्याची गरज असल्याबाबत या सर्व राज्यांनी सहमती व्यक्त केली. पर्यावरण आणि जैवविविधता यांचे संरक्षण करण्यासाठी अधिसूचना लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी या राज्यांनी केली आहे.
🌑पार्श्वभूमी-
🌦 पश्चिम घाटांच्या जैव विविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच या भागाचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना केली होती. या समितीने महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये पश्चिम घाटाच्या अंतर्गत येणारे भौगोलिक क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग म्हणून घोषित करावे अशी शिफारस केली होती. हे भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर करणाऱ्या अधिसूचनेचा मसुदा ऑक्टोबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.
🌑पश्चिम घाट-
🌦 जैवविविधता, खनिज संपदा यांनी समृद्ध असलेला व अनेक प्रजातींचे वस्तीस्थान असलेला पश्चिम घाट हा भारताच्या पश्चिमेला आहे. पश्चिम घाटाला ‘सह्य़ाद्री’ म्हणूनही ओळखले जाते.
🌦 ही पर्वतराजी तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेशेजारी सुरू होते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतून या पर्वतरांगा दक्षिण टोकाच्या जवळ पोचतात. या पर्वतराजीची लांबी 1600 कि.मी. असून याचा 60 टक्के भाग कर्नाटकात येतो. या पर्वतरांगांचे क्षेत्रफळ 60 हजार वर्ग कि.मी. असून पश्चिम घाटाच्या एकूण भूभागांपकी 30 टक्के भूभाग हा जंगलक्षेत्रात मोडतो. पश्चिम घाट हा जगातल्या जैवविविधतेच्या प्रमुख आठ (हॉटस्पॉट) प्रदेशांपैकी एक असून जगभरातल्या महत्त्वाच्या एकूण 34 प्रदेशांपैकी एक मानला जातो.
🌦 भारताच्या एकूण जैवविविधतेपकी 25 टक्के जैवविविधता पश्चिम घाटात आढळते. दरवर्षी प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक नवीन प्रजाती पश्चिम घाटामध्ये सापडतात. पश्चिम घाटातल्या जंगलांमुळे या प्रदेशातल्या हवामानावर अनुकूल परिणाम होतो. यामुळे पश्चिम उतार आणि पश्चिम किनारपट्टीवर अधिक पाऊस पडतो तर पूर्व उतारावर मध्यम पाऊस पडतो. पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे आणि खाड्या हे वाहतूक व अर्थोत्पादनासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
🌑टिप्पणी:
🌦 1988 साली नॉर्मन मेअर या संशोधकाने सर्वप्रथम जैवविविधता ‘हॉटस्पॉट’ याविषयी संकल्पना मांडली होती. जैवविविधता ‘हॉटस्पॉट’ हे धोकाग्रस्त जैवविविधता संपन्न प्रदेश असतात. हिमालय, हिंद-म्यानमार, पश्चिम घाट, अंदमान व निकोबार हे चारही जैवविविधतेचे क्षेत्र भारतात अंशत: वसलेले आहेत.
No comments:
Post a Comment