Saturday 30 May 2020

२१ जून


🅾उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.

🅾पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस १३ तास १३ मिनिटांचा असतो. त्यामुळे २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. २१ जूनपासून उत्तरायन संपून दक्षिणायन सुरु होते.

🅾या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. पृथ्वी अक्षवृत्त साडे तेवीस डिग्रीच्या झुकावाने ११ हजार किमी प्रती तासाच्या गतीने पश्चिमेकडून पूर्व दिशेला फिरते. यासोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील २१ जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस २२ डिसेंबर असतो.

🅾दिवस व रात्रीचा कालावधी कमी-जास्त होणे आपण नेहमीच अनुभवित असतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कलला असल्याने हे घडत असते. याचाच परिणाम म्हणूनही सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायनसुद्धा आपल्याला अनुभवता येते. कोणत्याही वस्तूच्या पडणार्‍या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायन व उत्तरायण आपल्यासुद्धा लक्षात येऊ शकते. पृथ्वीवरील ऋतुसुद्धा पृथ्वीच्या अक्षाच्या कलत्या स्थितीमुळेच निर्माण होतात.

🅾आकाशात वैषुविक आणि आयनिक वृत्तांचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आहेत. त्यापैकी एका बिंदूत २१ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो (याला वसंत संपात बिंदू म्हणतात) तर त्याच्याविरुद्ध बिंदूत २२ सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो (याला शरद संपात बिंदू म्हणतात.) या दोन्ही दिवशी रात्रीचा आणि दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो. इतर दिवशी मात्र दिनमान आणि रात्रमान हे कधीच सारखे नसते.

🅾२१ मार्चनंतर सूर्याचा प्रवास उत्तरेकडे सुरू होतो. याला उत्तरायण असे म्हणतात. यावेळी जसाजसा सूर्य उत्तरेकडे सरकतो. तसतसा दिवसाचा कालावधी वाढत जातो व रात्र कमी होऊ लागते. सूर्याचा हा उत्तरेकडचा प्रवास २१ जूनपर्यंत चालतो. या दिवशी सूर्य विषुववृत्ताच्या जास्तीत जास्त उत्तरेकडे असतो. अर्थात म्हणूनच या दिवशी दिवसाचा कालावधी अधिकाअधिक असतो व रात्र सर्वाधिक कमी कालावधीची असते. सूर्याच्या या अती उत्तरेकडील बिंदूला विष्टंभ म्हणजेच समर सोल्स्टाईस असे म्हणतात. या बिंदूपाशी सूर्य थोडासा थबकल्यासारखा भासतो व नंतर त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि येथून दिनमान कमी कमी होऊ लागते व रात्रमान वाढत जाते.

🅾२२ सप्टेंबर रोजी सूर्य शरद संपात बिंदूपाशी पोहोचतो. त्या दिवशी दिनमान व रात्रमान सारखेच असते. २२ सप्टेंबरनंतर सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडे सरकू लागतो आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो. आता मात्र दिनमान कमी होऊन रात्रमान वाढत जाते. २२ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला विंटर सोल्स्टाईस असे म्हणतात. या बिंदूत सूर्य असतानाच दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते.

🦋 🦋 🦋 🦋🦋 🦋🦋 🦋🦋 🦋

No comments:

Post a Comment