Friday, 8 May 2020

वायूकांड (विशाखापट्टणम वायुगळती)

भोपाळमध्ये १९८४ ला झालेल्या वायू गळतीच्या आठवणी अजूनही पुसलेल्या नाहीत. तेथील लोकांना काय भोगावे लागले, याच्या करूण कहाण्या अजूनही शहारे आणणा-या आहेत. आता देश एकीकडे कोरोनाच्या संकटाशी लढत असताना विशाखापट्टणम शहराजवळच्या एका रासायनिक प्रकल्पातून विषारी वायूची गळती झाल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. पाच हजारांहून अधिक जणांना वायूबाधा झाली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहराजवळ आर. आर. वेंकटापूरम परिसरात ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईजवळ अशीच छोटीशी वायू दुर्घटना घडली होती. या वायू गळतीचा परिणाम पाच किलोमीटर परिसरात जाणवतो आहे.

नशीब दाट लोकवस्तीच्या भागात ही कंपनी असती, तर वायू गळतीच्या बळींची संख्या वाढली असती. ग्रामीण भाग असल्याने तेथे लोकसंख्येची घनता कमी आहे. त्यामुळे जीवितहानी फार झाली नाही. या परिसरातील लोकांना डोळ्यांमध्ये जळजळ होत असून श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागातील लोकांनी या ठिकाणापासून दूर जायला सुरुवात केली आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना जास्त त्रास होत असल्याचे आढळून येत आहे. पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. लोकांना मेघाद्री गेड्डा आणि इतर काही ठिकाणी नेण्यात येत आहे. वायू गळतीची माहिती मिळताच आर. आर. वेंकटापूरम्, वेंकटापूरम्, पद्मनाभपूरम्, बीसी कॉलनी आणि कंपारापालेमच्या नागरिकांना इतरत्र हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

काही जण हा वायू नाकावाटे शरीरात गेल्यामुळे बेशुद्ध झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी एलजी पॉलिमर्स कंपनीत झालेल्या या वायू गळतीची माहिती घेतली असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. हा रासायनिक प्रकल्प एलजी पॉलिमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे. 1961 मध्ये सुरू झालेले येथील प्रकल्प हिंदुस्थान पॉलिमर्सच्या मालकीचे होते. 1997 मध्ये दक्षिण कोरियाच्या एलजी या कंपनीकडे याची मालकी आली.

भोपाळचा प्रकल्प अमेरिकेच्या कंपनीचा होता, तर विशाखापट्टणमचा प्रकल्प दक्षिण कोरियाचा आहे. स्टायरिन या वायूची गळती झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. टाळेबंदीनंतर कारखान्यात पुन्हा काम सुरू करण्यात आले होते. कंपनीच्या आजूबाजूच्या गावातील लोक गाढ झोपेत असताना गुरुवारी पहाटे तीन वाजता वायू गळती सुरू झाली. अनेकांना याबाबत लगेच लक्षात आले नाही; पण हळूहळू वायू गळतीचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली. चाैकशी होईल, कारवाईचे नाटक उभे राहील; परंतु विषारी वायू पोटात गेल्याचे परिणाम कित्येक दशके भोगावे लागतात, त्याची भरपाई कशी करणार, हा खरा प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment