Friday, 8 May 2020

वेण्णा

महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातून वायव्य- आग्नेय दिशेने वाहणारी कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी. हिचा उगम महाबळेश्वर पठारावर क्षेत्र महाबळेश्वर परिसरात असून तेथून उगम पावणाऱ्या पंचनद्यांपैकी ही एक आहे. सुमारे ६५ किमी. लांबीची ही नदी उत्तरेस हातगेगड-आर्ले (आरळे) डोंगररांग आणि दक्षिणेस सातारा डोंगररांग यांच्यामधून, प्रामुख्याने जावळी व सातारा तालुक्यांतून वाहत जाते व सातारा शहराच्या पूर्वेस सु. ५ किमी. वरील माहुली येथे कृष्णेला मिळते. या संगामामुळे माहुली हे क्षेत्राचे ठिकाण बनले आहे.
वेण्णा नदीच्या उगमप्रदेशातच महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असून तेथील ‘वेण्णा लेक’ नौकाविहारासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे ३९.६५ हेक्टर क्षेत्रात पसरलेला हा तलाव १८४२ च्या सुमारास तयार करण्यात आला. याचे मोठ्या जलाशयात रुपांतर करण्याचे काम पूर्ण होत आले आहे
(२०००). या तलावातून बाहेर पडणारे वेण्णा नदीचे पाणी जवळच असलेल्या लिंगमाळा (लिंगमळा) किंवा वेण्णा या सु. १८० मी उंचीच्या धबधब्यावरुन दरीत कोसळते. पावसाळ्यात या धबधब्याचे दृश्य मनोहारी असते. लिंगमळा भागात स्ट्रॉबेरी, मलबेरी, बटाटे (लाल रंगाचे) यांसारखी उत्पादने घेतली जातात. हा जास्त पावसाचा, संरक्षित जंगलप्रदेश असून या खोऱ्यात जांभूळ, पिसा, गेळा, हिरडा, शिकेकाई, कारवी इ. वनस्पतिप्रकार आढळतात.
वेण्णा नदीवर सातारा तालुक्यात सातारा शहराचा वायव्येस कण्हेर गावाजवळ १९८८ साली मातीचे धरण बांधण्यात आले आहे. धरणाची उंची ५०.३४ मी. असून उजवा कालवा ५८ किमी. तर डावा कालवा २१ किमी. लांबीचा आहे. कालव्यांचे काम १९९० साली पूर्ण झाले. धरणाची पाणी साठवण क्षमता २,८६० लक्ष घ. मी. आहे. एकूण लाभक्षेत्र १२,७४५ हे. असून त्यापैकी लागवडयोग्य क्षेत्र ११,०७८ हे. आहे.
१९९३-९४ मध्ये ओलिताखालील एकूण क्षेत्रापैकी बारमाही ५५४ हे. व हंगामी ६,४०५ हे. क्षेत्राला सिंचनाचा लाभ होत होता. या धरणाच्या जलाशयात मत्स्यव्यवसायाचा विकास करण्यात आला आहे. १९९० साली कण्हेर येथे ४ मेवॉ. वीज निर्मितिक्षमतेचे जलविद्युत्‌ केंद्र उभारण्यात आले आहे. केळघर, मेढा, कण्हेर ही वेण्णा नदीखोऱ्यातील प्रमुख गावे आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...