Friday, 8 May 2020

नीरा नदी

कृष्णा नदीच्या भीमा ह्या उपनदीची उजवीकडील महत्त्वाची उपनदी. ही पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगर रांगांत उगम पावते.

पूर्वेस काही अंतर गेल्यावर ती ईशान्य दिशेने वाहते.
भाटघरजवळच तिला डावीकडून येळवंडी नदी मिळते. भोरपासून इंगवली गावापर्यंत नीरा तीव्र वळणे घेऊन मग पुन्हा पूर्ववाहिनी होते. तेथे तिला उत्तरेकडून शिवगंगा नदी मिळते. नंतर नीरा पुणे जिल्ह्याची दक्षिण सीमा बनते.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यांतून वाहात गेल्यानंतर, ती सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात उत्तरेकडे वळते आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व माळशिरस तालुका यांची सरहद्द बनते. सुमारे १६० किमी. वाहात गेल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या आग्नेयीस इंदापूर तालुक्यातील नरसिंगपूरजवळ भीमा नदीस मिळते. तेथे जवळच संगम नावाचे गाव आहे.

पुणे – बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर शिरवळजवळच या नदीवर पूल बांधला आहे. नीरा नदी मुख्यतः जलसिंचनासाठी उपयुक्त आहे. तिच्या येळवंडी उपनदीवर भाटघर येथे बांधलेल्या लॉइड धरणाचे पाणी नीरेतच सोडले जाते.

वीर गावाजवळ नीरा नदीवर धरण बांधले असून डावा व उजवा असे दोन कालवे काढले आहेत [ वीर धरण]. नाटंबी येथे या नदीवर आणखी एक धरण बांधण्याची योजना आहे.

No comments:

Post a Comment