Thursday, 6 January 2022

किनारा व किनारी प्रदेश


🔹महासागर,समुद्र किंवा मोठ्या सरोवरासारखा जलाशय यांचे पाणी त्याशेजारची कोरडी जमीन यामधील सीमारेषेला किनारा म्हणतात. नदीतीरालाही कित्येकदा नदीकिनारा म्हणतात.

🔸काही वेळेला किनाऱ्याला लागून असलेल्या कमीअधिक रूंदीच्या सखल प्रदेशालाही किनारा म्हणतात; परंतु त्याला किनारी प्रदेश किंवा किनारी मैदान म्हणणे अधिक योग्य ठरेल. ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी जेथवर जमीनीपासून दूर जाते, तेथपासून लाटांचे पाणी जमीनीवर जास्तीतजास्त जेथपर्यंत पोहोचते, त्या भागाला (समुद्राचा) किनारा म्हणजे अधिक सयुक्तिक होय.

🔹किनाऱ्याचे स्वरूप, त्याचे घटक खडक, त्यांची संरचना, तेथील जमीनीवर विदारण, जलप्रवाह, गर्फ, वारा इ. क्षरणकारकाचे कार्य होऊन तिला आलेले स्वरूप, समुद्राच्या लाटा आणि किनाऱ्याजवळून वाहणारे समुद्रप्रवाह यांचे कार्य आणि किनाऱ्याचे समुद्रात होणारे निमज्जन किंवा समुद्रातून त्याचे होणारे उन्मज्जन, यांवर मुख्यतः अवलंबून असते.

🔸उन्मज्जन व निमज्जन या क्रिया दीर्घकालीन, अत्यंत सावकाश होणाऱ्या असतात; क्वचित भूकंपासारख्या हालचालींमुळे त्या वेगाने घडून येतात. समुद्राचे पाणी कमी होऊन त्याची पातळी खाली गेल्यामुळे वा
किनाऱ्याजवळची पाण्याखालची जमीन अंतर्गत हालचालीमुळे वर उचलली गेल्याने किनाऱ्याचे उन्मज्जन होते; तर समुद्राचे पाणी वाढून त्याची पातळी वर आल्यामुळे किंवा किनाऱ्याजवळची जमीन अंतर्गत हालचालींमुळे खचल्याने किनाऱ्याचे निमज्जन होते. हिमयुगांच्या जास्तीतजास्त वाढीच्या वेळी समुद्राची पातळी हल्लीपेक्षा निदान ३०० मी. कमी होती.

🔹शेवटच्या हिमयुगानंतर बर्फ वितळून समुद्रांची पातळी वाढून त्यांना हल्लीची पातळी प्राप्त झाली आहे. हल्लीच्या सर्व हिमनद्या व बर्फ वितळले, तर समुद्राची पातळी आणखी ६० ते ७० मी. वाढेल असा अंदाज आहे.

🔹उन्मज्जन पावलेल्या किनाऱ्याचा भाग त्याआधी पाण्याखाली बहुतांशी सपाट असल्यामुळे असा किनारा एकसारखा व सरळ असतो. भारताचा केरळ किनारा व पूर्व किनाऱ्याचा बराच भाग या प्रकारचा आहे. याउलट निमज्जन पावलेला किनारा बहुधा वेडावाकडा, विषम व दंतुर असतो.
विशेषतः टेकड्या व दऱ्याखोरी यांनी भरलेला किनारी प्रदेश निमज्जन पावला, तर तो अगदी विषम व ठिकठिकाणी समुद्राचे लांब व खोल फाटे आत शिरलेले अशा स्वरूपाचा बनतो. निमज्जनामुळे नद्यांची मुखे पाण्याखाली जाऊन तेथे खाड्या आणि आखाते तयार होतात. खाड्या या पुष्कळदा सापेक्षतः
उथळही असतात. नदीखोऱ्याचा प्रदेश या प्रकारे पाण्याखाली गेला म्हणजे तेथे जवळच्या उपनद्यातूनही अंतर्भागात जाण्यास जलमार्ग मिळतो, सागरतळ बहुधा सावकाश उतरता होत गेलेला असतो, किनाऱ्याजवळचा भूभाग सापेक्षतः अधिक रूंद असून व्यापारी दृष्ट्या सोयीचा असतो. अशा किनाऱ्याला रिया' किनारा म्हणतात. त्याची उत्तम उदाहरणे म्हणजे स्पेनचा वायव्य किनारा आणि आयर्लंडचा नैर्ऋत्य किनारा ही होत.
जावा, सुमात्रा, मलाया व बोर्निओ हे एकत्र जोडलेले होते, तेंव्हाचा त्यामधील प्रदेश निमज्जन पावल्यामुळे आज ते वेगवेगळे दिसतात. परंतु त्यामधील सागरतळावर पूर्वीच्या नद्या व त्यांच्या उपनद्या यांच्या प्रवाहाच्या खूणा स्पष्टपणे आढळून येतात. एड्रिऍटीक समुद्रावरील युगोस्लाव्हियाच्या किनाऱ्याजवळ किनाऱ्याला समांतर डोंगराच्या तीन ओळी होत्या.
त्यापैकी एक जमीनीवर संपूर्णपणे कोरडी आहे; तिच्यानंतरची दुसरी अंशतः निमज्जन पावल्यामुळे तिच्या किनाऱ्याला समांतर दऱ्यात अरूंद मार्गांनी पाणी शिरले आहे आणि तिसरी रांग अधिक निमज्जन पावल्यामुळे तिची फक्त काही शिखरेच तेवढी बेटांच्या रांगेच्या रूपाने पाण्याबाहेर आहेत.

🔸अशा किनाऱ्याला डाल्मेशियन' किनारा म्हणतात. हिमनद्यांनी कोरलेल्या दऱ्या पुष्कळदा समुद्रसपाटीपेक्षा खोल असतात. त्यांच्या बाजू उभ्या असून त्यांवर उंच डोंगर असतात.
बर्फ वितळून किंवा जमीन खचून अशा दऱ्यात समुद्राचे पाणी शिरले म्हणजे पाण्याच्या त्या लांब चिंचोळ्या फाट्यास `योर्ड' म्हणतात. त्यांच्या मुखाजवळ लहान लहान बेटे असतात. योर्डमधील पाणी खूप खोल असते. आणि त्यांच्या काठी सपाट जमीनीची अगदी चिंचोळी पट्टी असते.
त्यामागे डोंगर असतात. त्यामुळे समुद्रातून अंतर्मागाशी दळणवळण ठेवण्यास योर्ड उपयोगी पडत नाहीत. परंतु मासेमारींना आणि जहाजांना सुरक्षित आसरा म्हणून त्यांचा चांगला उपयोग होतो.

🔹असे योर्ड नॉर्वे, स्कॉटलंड, चिलीचा दक्षिण भाग व न्यूझिलंडचे दक्षिण बेट येथे विशेषेकरून आढळतात.

No comments:

Post a Comment