Sunday, 6 March 2022

कुतूहल : राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था

- वाढलेली सागरी वाहतूक; रासायनिक कारखाने, कंपन्या आणि घरांमधून समुद्रात सोडले जाणारे प्रदूषित पाणी; समुद्रात साठणारा प्लास्टिकचा प्रचंड कचरा; मोठय़ा प्रमाणावर होणारी यांत्रिक मासेमारी या सगळ्यांचा दुष्परिणाम सागरी पर्यावरणावर होत आहे.

- याबरोबरच समुद्रात इंधन आणि वाळूसाठी उत्खनन होते. गाळ एकाच जागी साचतो. याचा परिणाम जलचरांवर होतो. या सर्व समस्यांवर अभ्यास आणि संशोधन होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने १९६६ साली राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी- एनआयओ) या संस्थेची स्थापना करण्यात आली.

- या संस्थेचे मुख्यालय गोव्यातील डोना पावला येथे असून कोची, मुंबई आणि विशाखापट्टणम येथे प्रादेशिक केंद्रे आहेत. दिल्ली येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) च्या घटक प्रयोगशाळांपैकी एनआयओ ही एक संस्था आहे. मोठय़ा संख्येने असलेले समुद्र शास्त्रज्ञ आणि योग्य समुद्री संशोधन या पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेली सीएसआयआरची एनआयओ ही संस्था महासागर विज्ञानातील प्रगत शिक्षणाचे केंद्र आहे.

- १९६० च्या दशकात आंतरराष्ट्रीय हिंद महासागर मोहिमेनंतर १ जानेवारी १९६६ रोजी एनआयओची स्थापना करण्यात आली. आज ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली असून या संस्थेमार्फत हिंद महासागरातील समुद्रशास्त्रीय वैशिष्टय़ांचे संशोधन केले जाते. आतापर्यंत येथे पाच हजारांहून अधिक विषयांवर संशोधन- लेखन झाले आहे.

- एनआयओच्या गोवा मुख्यालयात तसेच प्रादेशिक केंद्रांवर अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. यात ‘आर. व्ही. सिंधू संकल्प’ आणि ‘आर. व्ही. सिंधू साधना’ या दोन समुद्रीशास्त्रीय निरीक्षणासाठी सुसज्ज अशा जहाजांचा समावेश आहे.

-  अभ्यासासाठी तब्बल १५ हजार पुस्तके
आणि २० हजार शोधनियतकालिके असा ज्ञानसाठाही येथे आहे.
संस्थेत अनेक संशोधन घटकांचा समावेश आहे. मुख्यत्वे हिंदी महासागर जैविक केंद्र (आयओबीसी), जैविक समुद्र विज्ञान विभाग, भौतिक समुद्रशास्त्र विभाग, नियोजन आणि विदा विभाग, इत्यादी. गोव्यातील फील्ड युनिट मे १९६७ मध्ये सुरू केले गेले.

- आपल्या सभोवतालच्या समुद्रांबद्दल अभ्यास आणि पाण्याचे भौतिक, रसायन, जैविक, भूवैज्ञानिक, भू-भौतिक, अभियांत्रिकी आणि प्रदूषण या अनुषंगाने संशोधन करून ते ज्ञान सर्वासाठी खुले करणे, हे या संस्थेचे ध्येय आहे.
--------------------------------------------------

No comments:

Post a Comment