भारतात ३० जानेवारी रोजी पहिला करोना रुग्ण सापडला होता त्याच्या नमुन्याआधारे हे प्रतिमा चित्रण करण्यात आले आहे.
भारतातील करोना विषाणू (कोविड १९) प्रतिमा मिळवण्यात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयआव्ही) वैज्ञानिकांना यश आले असून या प्रतिमा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक छायाचित्र तंत्राने घेण्यात आल्या आहेत. या प्रतिमा इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रीसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध होणार असून भारतात ३० जानेवारी रोजी पहिला करोना रुग्ण सापडला होता त्याच्या नमुन्याआधारे हे प्रतिमा चित्रण करण्यात आले आहे.
वुहानमधून परतलेल्या तीन विद्यार्थ्यांमधील एका मुलीला परत आल्यानंतर करोनाची लागण दिसून आली होती. ही मुलगी केरळातील असून तिच्या घशातील नमुन्यात सापडलेल्या या विषाणूंच्या प्रतिमा मध्यपूर्व श्वासन रोगाशी साधर्म्य असलेल्या आहेत. ज्याला मीडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणतात. तो विषाणू करोनाचाच प्रकार होता व २०१२ मध्ये त्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. आताचा विषाणू हा २००२ मधील सार्स-करोना विषाणूशीही साधर्म्य दाखवणारा आहे.
विषाणूच्या प्रवासाचा उलगडा होऊ शकतो
भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे माजी संचालक डॉ. निर्मल गांगुली यांनी सांगितले की, “करोना विषाणूवर काट्यांसारखी रचना असते त्यामुळे त्यांना करोना म्हणतात. त्यावर शर्करा व प्रथिन संग्राहकांचा समावेश असतो. ते काटे पेशीत रुतले जातात व नंतर यजमान पेशीला चिकटून विषाणू आत घुसतो. विषाणूचे जे प्रतिमा चित्रण करण्यात आले आहे त्यावरून त्याचे जनुकीय मूळ व उत्क्रांती समजते व त्यातून हा विषाणू प्राण्यातून माणसात व नंतर माणसातून माणसात कसा पसरला याचा उलगडा होऊ शकतो.”
विषाणूंचा आकार गोल
पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत केरळातील नमुने तपासण्यात आले. त्यानुसार भारतातील कोविड १९ विषाणू हा चीनच्या वुहानमधील विषाणूशी ९९.९८ टक्के जुळणारा आहे. अजून तो उत्परिवर्तित होत असून त्यावर औषधे व लसी बनवता येतील. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी रोगनिदान विभागाचे उपसंचालक डॉ. अतनु बसू यांनी सांगितले की, “विषाणूचा अभ्यास केला असता त्याचा कण हा ७५ नॅनोमीटरचा दिसतो, त्याचा काटा हा ग्लायकोप्रोटिनचा असून त्यामुळेच तो यजमान पेशीत घुसू शकतो. केरळातील मुलीच्या स्राव नमुन्यातील ५०० मायक्रोलिटर भागातून हा विषाणू वेगळा काढण्यात आला व त्याची चाचणी पॉलिमरेज अभिक्रियेने करण्यात आली. त्यातील द्रव भाग वेगळा काढून १ टक्के ग्लुटारेल्डीहाइडच्या मदतीने व नंतर कार्बन आवरण असलेल्या तांब्याच्या गाळणीतून गाळला गेला. त्यानंतर सोडियम फॉस्फोट्युनिस्टिक आम्लाचा वापर करण्यात आला. नंतर १०० केव्हीच्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या मदतीने कॅमेरा लावून त्याच्या प्रतिमा घेण्यात आल्या. हा विषाणू ७०-८० नॅनोमीटरचा असून त्यात १५ नॅनोमीटरचे कवच आहे. अशा सात विषाणू कणांचे चित्रण यात करण्यात आले. या विषाणूंचा आकार गोल दिसून आला आहे.”
No comments:
Post a Comment