Tuesday, 31 March 2020

अमेरिका-चीनमधील ‘कोरोनावॉर’: नवीन विश्वरचनेच्या निर्मितीचे संकेत 

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळली तेव्हापासून अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष सातत्याने पुढे येत गेला. गेल्या काही महिन्यांत हा संघर्ष शिगेला पोहोचला. दोन्ही राष्ट्रांमध्ये जवळपास दोन वर्षे व्यापारयुद्धही सुरु होते. या व्यापारयुद्धातही दोनही देशांचे संबंध कमालीचे तणावपूर्ण झाले होते. हा तणाव काही आठवड्यांपूर्वी निवळल्यामुळे संपूर्ण जगानेच सुटकेचा निःश्‍वास टाकला होता. परंतु कोरोना कोविड १९ या विषाणूच्या महामारीचा उद्रेक झाला आणि त्याची जबरदस्त झळ अमेरिकेलाही बसल्यामुळे दोन्ही देशांतील संबंध पुन्हा विकोपाला जाण्याइतपत ताणले जाऊ लागले आहेत. 
चीनच्या वुहानमधून उगम पावलेल्या कोरोनाने अमेरिकेत अक्षरशः कहर केला आहे. आजघडीला इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंड ही या विषाणूची केंद्रे बनली आहेत. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. या विषाणूजन्य आजारामुळे मरणार्‍यांची संख्या हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे संपूर्ण अमेरिका, तेथील समाजजीवन आणि अर्थकारण संकटात सापडले आहे. त्यामुळेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चीनवर उघड आरोप करायला सुरूवात केली आहे. जोपर्यंत हा विषाणू चीनपुरता मर्यादित होता, तोपर्यंत ट्रम्प यांनीही त्याला ङ्गार महत्त्व दिलेले नव्हते, किंबहुना हा फ्लूचा प्रकार आहे, त्याचा फारसा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होणार नाही, अशा स्वरूपाची वक्तव्ये ट्रम्प यांच्याकडून केली गेली. पण जसजसा कोरोना विषाणूचा प्रसार हा वाढू लागला आणि जेव्हा त्याचा प्रसार अमेरिकेत वाढायला लागला, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ लागले त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रीय आणीबाणी घोषित करावी लागली. अमेरिकेचा शेअऱ बाजार गडगडला. नंतर ट्रम्प यांच्या असेही लक्षात आले की केवळ अर्थव्यवस्थाच नाही तर कोरोनाच्या विळख्यामध्ये अमेरिकेतील बहुतांश राज्ये आली आहेत. मग मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदांमध्ये उघडपणे चीनला लक्ष्य करायला सुरुवात केली. चीनने जगाला संकटात टाकले आहे, असा आरोप त्यांनी जाहीरपणाने केला. त्यांनी कोरोना विषाणूला चायना व्हायरस किंवा वुहान व्हायरस असे म्हटले. ट्रम्प यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद चीनमध्ये उमटले. चीनने लागलीच त्यावर प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. हा विषाणू चीनकडून आलेला नसून उलट अमेरिकेच्या लष्कराने याचा प्रसार केला आहे, असा गंभीर आरोप चीनकडून करण्यात आला. एवढेच नव्हे तर चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी जागतिक पातळीवर एक अजेंडा ठरवला, ज्यामध्ये काही मुद्द्यांवर भर देण्यात आला. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे ,या विषाणूचा जन्म चीनमध्ये झालेला नसून तो अमेरिका पुरस्कृत विषाणू आहे. दुसरा मुद्दा म्हणजे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठीच्या लढ्यात चीनमधल्या साम्यवादी शासनाला आणि राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग यांनी केलेल्या सर्व कारवाईला कमालीचे यश मिळाले आहे. परंतु पाश्‍चिमात्य देश विशेषतः अमेरिका या विषाणूवर नियंत्रण मिळवू शकत नाहीये. त्याचप्रमाणे अमेरिकेने चीनवरून जाणारे विमान बंद केले आहे, त्यावरही चीनने विरोध दर्शवला आहे. 
या दोन्ही राष्ट्रांकडून परस्परांवर होणार्‍या आरोपांची तीव्रता वाढली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यानंतर युरोपातून येणारी सर्व विमाने थांबवली आहेत. केवळ अमेरिकाच नव्हे आज सर्वच देश दुसर्‍या देशाला मदत करण्याच्या मनस्थितीत नाहीत. अशा परिस्थितीत चीनने युरोपला मदतीचा हात देऊ केला. चीनकडून युरोपला मोठ्या प्रमाणावर औषधे, मास्क, सॅनिटायझर यांचा पुरवठा केला जात आहे. चीनने आपल्या प्रपोगंडा

मशीनचा वापर करत जगाला हे दाखवायला सुरूवात केली की आमच्यावर एवढे मोठे संकट असूनही आम्ही सर्व जगाला सगळ्या गोष्टी पुरवतो आहोत. या प्रपोगोंडा गेममध्ये चीनला यश मिळाले आहे. आज जगाच्या मदतीसाठी चीन सरसावतो आहे असे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे, जागतिक महासत्ता असणारा अमेरिका मात्र स्वतःच्या गोष्टींमध्येच गुंतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनचे महत्त्व वाढते आहे. 
चीनने सांगितले कोरोना विषाणू संसर्गावर आम्ही पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे, असा दावा केला आहे. आमच्याकडील उद्योगधंदे हळूहळू सुरू होत आहेत, असेही चीन सांगत आहे. परंतू कोरोनाचा प्रसार अजून किती काळ होत राहील, याबाबत कोणालाच काही सांगता येत नाहीये. त्यामुळे कोरोना विषाणूचा झटका अमेरिका आणि युरोपला जबरदस्त बसणार आहे. साहजिकच अशा स्थितीमध्ये येत्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारण हे चीनकेंद्रीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
आज संपूर्ण अमेरिकेत भीतीचे वातावरण आहे. ह्या वातावरणामागे आर्थिक असुरक्षितता हे महत्त्वाचे कारण आहे. कदाचित अमेरिकेला या परिस्थितीची क

ल्पना असावी. १९९३ पासून म्हणजे गेल्या तीस वर्षात कोक आणि ड्रॅगन हे एकत्र जाऊ शकतात अशा पद्धतीची मान्यता संपूर्ण अमेरिकेत होती. कोक म्हणजे अमेरिका आणि ड्रॅगन म्हणजे चीन. आपण चीनबरोबर शत्रुत्व करण्यापेक्षा किंवा त्याला शत्रु मानण्याऐवजी जर दोघांनी एकत्रित काम केले तर कदाचित दोन्ही देशांचा ङ्गायदा होईल, अशी मांडणी करण्यात आली आणि त्यानुसार पुढील गोष्टी घडत गेल्या. खूप अमेरिकन कंपन्या या चीनी कंपन्यांकडून मिळणार्‍या कच्चा मालावर विसंबून होत्या. आजघडीला अमेरिकेतील औषध निर्मिती उद्योग पूर्णपणे चीनकडून जो कच्चा माल दिला जातो, (ङ्गार्मास्युटिकल्स इनग्रेडियंटस) त्यावर अवलंबून आहे. हा माल चीनकडून मिळत नाही तोपर्यंत अमेरिकेत औषधनिर्मिती होऊ शकत नाही इतकी गंभीर परिस्थिती आहे. म्हणजे अमेरिकेत निर्माण होणारी प्रतिजैविके किंवा अँटीबायोटिक्स आजघडीला १०० टक्के चीनच बनवतोय. त्यामुळे चीनच्या एका सरकारी अधिकार्‍यांने असे वक्तव्य केले होते की आम्ही अमेरिकेचा औषधपुरवठा बंद केला तर अख्खा अमेरिका कोरोना विषाणूमुळे उद्धवस्त होईल. हे वक्तव्य अत्यंत स्ङ्गोटक होते. 
सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वातावरण असल्याने या सगळ्याला पक्षीय राजकारणाचे रूप दिले जात आहे. यावरुन संपूर्ण अमेरिकेत ङ्गूट पडताना दिसतेय. काही जण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे संशयाने पाहू लागले आहेत. विशेष म्हणजे चीनला डोनाल्ड ट्रम्प हे पुढील राष्ट्राध्यक्ष म्हणून नको आहेत. त्यामुळे चीनने त्यांच्यावरील आरोप अधिक तीव्र करायला सुरूवात केली आहे. आता दोन्ही देशामधील आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध आता प्रपोगंडा युद्धाचे रूप घेते आहे. शीतयुद्धाच्या काळात जसे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील प्रपोगंडा मशिनरी होती ती परस्परांच्या विरोधात असे आरोप प्रत्यारोप करणे, पुरावे सादर करणे, दावे प्रतिदावे करणे अशाच प्रकार आता चीन आणि अमेरिकेच्या बाबतीत सुरू झाला आहे. यास कोरोना विषाणू हे नवीन कारण मिळाले आहे. सत्तेची नवी समीकरणे पुढे येत आहेत. दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिका आणि युरोप हे सातत्याने एक होते, त्यातही पश्‍चिम युरोप. तर अमेरिकेने नाटोसारखी लष्करी संघटना काढली होती. ही संघटना अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होती. दुसर्‍या महायुद्धात युरोपचे जे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते, ते भरून काढण्यासाठी अमेरिकेने मार्शल प्लान, ट्रूमन यांसारख्या काही महत्त्वाच्या आर्थिक मदतीच्या योजना राबवल्या होत्या. याच्या अंतर्गत युरोपला मोठ्या प्रमाणावर मदत केली गेली. पण आजच्या परिप्रेक्ष्यात हाच युरोप अमेरिकेपासून दूर जाताना दिसतो आहे.
अर्थात याला कारण डोनाल्ड ट्रम्प हेच आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतरच युरोप आणि अमेरिकेत खटके उडायला सुरूवात झाली. आता तर या मतभेदाने कळस गाठला आहे. अमेरिका ङ्गर्स्ट या ट्रम्प यांच्या धोरणामुळे या मतभेदांना सुरूवात झाली होती. कोरोना विषाणू संसर्गामुळे अमेरिकेच्या हाती कोलित

मिळाल्यासारखे झाले आहे. ट्रम्प यांनी युरोपशी व्यवहारच पूर्णपणे बंद केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपातून अमेरिकेला येणारी विमाने बंद केली तेव्हा युरोपने त्याचा निषेध करत ‘याची आवश्यकता नव्हती’ असे वक्तव्य केले. या नाराजीमुळेच युरोप अमेरिकेपासून दूर जात असताना चीनने हुशारीने ही संधी साधली आहे. आज चीन युरोपच्या जवळ येत चालला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायातील १९३ देशांापैकी अमेरिकेचा अपवाद वगळता कोणीही चीनवर टीका करत नाहीये. एवढेच नव्हे तर चीन जे आरोप अमेरिकेवर करतो आहे त्याला रशिया आणि इराण यांचे समर्थन मिळते आहे. त्यामुळे एकीकडे युरोप, चीन, रशिया, इराण यांसारखे पूर्वी वैचारिक विरोधक असलेले देश एकत्र येताना दिसताहेत आणि अमेरिका मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटा पडताना दिसतो आहे.
मागील काळात अमेरिकेने मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांना, बहुराष्ट्रीय संस्था संघटनांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करायची आणि अशी मदत केल्यानंतर त्यांना आपल्या हितसंबंधांना वापरून घ्यायचे अशी एक प्रकारची रणनीती आखली होती. तोच प्रकार आता चीन करतो आहे. चीनची अर्थव्यवस्था मोठी असल्याने, जगभरात त्यांचे अब्जावधी रूपयांचे प्रकल्प सुरू आहेत. चीनने आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांना मोठी आर्थिक मदत करायला सुरूवात केली आहे. विशेषतः जागतिक आरोग्य संघटनाही चीनची बाजू उचलून धरते आहे. या संपूर्ण संघर्षामुळे एक नवी विश्‍वरचना आकाराला येण्याची दाट शक्यता आहे. याला कोरोनापश्‍चातची विश्‍वरचना म्हणता येईल. या रचनेमध्ये अमेरिका हा बर्‍यापैकी बाजूला पडलेला असेल आणि अमेरिकेच्या बाजूला जाण्याने एक पोकळी निर्माण होणार आहे ती पोकळी चीन भरून काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक वेगळेच चीनकेंद्रीत जग कदाचित पहायला मिळू शकते. 

No comments:

Post a Comment