Monday, 16 March 2020

मास्क आणि हँड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये

🔰केंद्र सरकारने N95 मास्क, सर्जिकल मास्क आणि हँड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने याबाबत आदेश दिला आहे.

🔰देशभरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागणाऱ्या मास्क आणि हँड सॅनिटायझरच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी त्यांचा काळा बाजार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे चढ्या दराने विक्री, साठेबाजी आणि काळाबाजार रोखणे शक्य होणार आहे. सदर आदेश 30 जून 2020 पर्यंत कायम राहणार असून त्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

🔰या निर्णयामुळे, बाजारात जर आपल्याला मास्क मिळाला नाही तर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 1800-11-400 या राष्ट्रीय ग्राहक क्रमांकावर तक्रार करावी लागणार.

अत्यावश्यक वस्तू कायदा-1955

🔰अत्यावश्यक वस्तू कायदा हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे. चढ्या दराने वस्तूंची विक्री, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. यात अन्न-धान्य, औषधे, खते, डाळी व खाद्यतेल आणि इंधन (पेट्रोलियम उत्पादने) इत्यादींचा समावेश आहे.

🔰या व्यतिरिक्त, सरकार अत्यावश्यक वस्तू घोषित करण्यात आलेल्या कोणत्याही डब्बाबंद असलेल्या उत्पादनाची कमाल किरकोळ किंमत (MRP) निश्चित करू शकते. गरज भासते तेव्हा केंद्र सरकार या यादीत नवीन वस्तूंचा समावेश करू शकते आणि परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांना या यादीतून वगळू शकते.

No comments:

Post a Comment