Sunday, 1 March 2020

राजापुरची कजोल गुरव आशियाई पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी भारतीय संघात

- इंडोनेशिया येथे 6 ते 8मे, 2020 दरम्यान होणार्‍या आशियाई पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये राजापूरची सुकन्या काजोल अशोक गुरव हिची भारतीय पॉवरलिफ्टींग संघात निवड झाली आहे. यावर्षी सिनियर राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक आणी फेडरेशन कप स्पर्धेतील नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर काजोलची भारतीय संघात निवड झाली आहे.

- तिच्या या निवडीने राजापूर तसेच रत्नागिरी जिल्ह्याची मान उंचावली आहे. गेल्या 8 वर्षांपासून काजोल पॉवरलिफ्टींग हा खेळ खेळत आहे. यामध्ये तिने आजवर विद्यापीठस्तरीय तसेच ज्युनिअर, सिनिअर स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली आहे. गेल्या 3 वर्षातील तिच्या कामगिरीतील सातत्य आणि मेहनत यांच्या जोरावर भारतीय संघासाठी खेळण्याचे तिचे स्वप्न आज पूर्ण होत असल्याचे काजोलने सांगितले. एवढेच नव्हे तर या स्पर्धेत देशासाठी पदक मिळवण्याचा विश्वास तिने व्यक्त केला आहे. यासाठी गेली काही वर्षे ती सातत्याने कसून सराव करत आहे.

- काजोल ही सध्या पश्चिम रेल्वेमध्ये सेवेत असून गेली 3 वर्षे ती पश्चिम रेल्वेकडून पॉवरलिफ्टींग स्पर्धा खेळत आहे. राजापूर येथे शिवशक्ती कीडा मंडळाच्या व्यायामशाळेत ती दररोज4 तास कसून सराव करते. आजवर राष्ट्रीय स्पर्धेत तीने स्कॉट 190 किलो, बेंचपेस 105 किलो, डेडलिफ्ट 180 किलो असे एकूण 475 किलो वजन अवघ्या 52 किलो वजनगटात उचलले आहे. आशियाई स्पर्धेमध्ये काजोल पुन्हा 52 किलो वजनीगटात भारतीय संघातून सहभागी होईल, या स्पर्धेत तिने आजवरची सर्वोच्च कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे.

- 2013 मध्ये काजोलचा भाऊ प्रतिक गुरव याने भारताचे प्रतिनिधीत्व करताना पॉवरलिफ्टींगमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून राजापूरचे नाव उंचावले होते. याचीच पुनरावृत्ती करण्याचे स्वप्न तीच्या मनात आहे, असे काजोलने सांगितले. येत्या 7 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान काजोल हिमाचल प्रदेश येथे भारतीय रेल्वेच्या सराव शिबिराला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी जाऊन नंतर लगेचच इंडोनेशिया येथे आशियाई स्पर्धेसाठी रवाना होणार आहे

No comments:

Post a Comment