Thursday, 6 January 2022

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके


♻️भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक म्हणजेच क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. आज त्यांची (17 फेब्रुवारी 1883) पुण्यतिथी, या निमित्त जाणून घेऊ त्यांच्या विषयी माहिती.

फडक्यांचे मूळ घराणे कोकणातील केळशी (रत्नागिरी) येथील. मात्र शिरढोण (रायगड) गावी फडके कुटुंबाचे नंतर वास्तव्य झाले. वासुदेव यांचा जन्म (4 नोव्हेबेर 1845) शिरढोण येथे झाला.

सातव्या वर्षापासून त्याच्या शिक्षणास सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले. 1855 - 60 या वर्षांत माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी झाले. वासुदेवाने पाचवीनंतर शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली.

पहिली नोकरी जी.आय्. पी. रेल्वेत केली. वरिष्ठांपुढे उगाच विनम्र होण्याचा गुण अंगी नसल्यामुळे त्यांची रेल्वेमधली नोकरी सुटली व नंतरची ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही फार दिवस टिकली नाही.

शेवटी 1863 मध्ये वासुदेव बळवंत लष्कराच्या हिशेबी खात्यात आले. मुंबईहून त्यांची बदली 1865 ला पुणे येथे झाली, आणि पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली. वासुदेव बळवंताची वृत्ती अत्यंत संवेदनशील.

वेळेवर रजा मंजूर न झाल्यामुळे आजारी आईची भेट झाली नाही, तेव्हा वासुदेव बळवंतांनी वरिष्ठांपर्यंत आपली तक्रार नोंदविली. त्यांच्या आयुष्याला क्रांतिकारक वळण लावणारी ही महत्त्वाची घटना.

श्रीशैलम् येथील मल्लिकार्जुनास आत्मसमर्पण करण्याचे त्यांनी ठरविले. (17 एप्रिल 1879). त्याच दिवशी वासुदेव बळवंतांनी आपल्या आत्मचरित्रलेखनास सुरुवात केली.

विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी या गावी एका बौद्ध विहारात त्यांना निद्रिस्त अवस्थेत त्यांच्या काही अनुयायांसह पकडण्यात आले. (21 जुलै 1879). पुणे येथे त्यांच्यावर खटला चालविण्यात आला.

न्या. न्यूनहॅम यांनी त्यांना जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली. पुढे त्यांची रवानगी 1880 च्या जानेवारीत एडनच्या तुरुंगात झाली. तेथून आत्महत्या करण्याचा व पळून जाण्याचा वासुदेव बळवंताचा प्रयत्न फसला.

तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा यांमुळे त्यांची प्रकृती बिघडली, आणि क्षयरोगाने त्यांना पछाडले. त्यातच त्यांनी अन्नग्रहण सोडले. ते एडन येथील कारावासातच मरण पावले.

भारतात त्यांनी पहिल्यांदाच सशस्त्र लढ्याची मुहूर्तमेढ रोवली. ही सशस्त्र उठावाची चळवळ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देशभर पसरली. म्हणून त्यांना ‘लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’ म्हणतात.

No comments:

Post a Comment