मुंबई, नागपूर: ‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार शिकारी, समुद्र किनाऱ्यावरील स्थलांतरित आणि पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ पक्ष्यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात गरुड आणि गिधाडांच्या संख्येत घट झाली असून, मोरांच्या संख्येत नाटय़मयरीत्या वाढ झाली आहे.
देशभरातील दोन सरकारी आणि सहा स्वयंसेवी संस्था आणि अनेक पक्षी निरीक्षकांनी ‘सिटिझन सायन्स’ या संकल्पनेचा वापर करून हा अहवाल तयार केला आहे. पंधरा हजार पाचशे पक्षी निरीक्षकांच्या सुमारे एक कोटी निरीक्षणांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला.
यामध्ये देशभरातील सुमारे ८६७ पक्ष्यांच्या सद्य:स्थितीचा मागोवा घेण्यात आला. गेल्या २५ वर्षांतील निरीक्षणांचा यामध्ये समावेश आहे. ‘ई-बर्ड’ या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून ही माहिती संकलित करण्यात आली आहे. हा अहवाल गांधीनगर येथे स्थलांतरित पक्षी परिषदेत सोमवारी प्रकाशित करण्यात आला.
शिकारी पक्षी, स्थलांतरित पाणपक्षी आणि अधिवासनिष्ठ पक्ष्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे या अभ्यासातून दिसून येते. तसेच कीटकभक्षी पक्ष्यांची संख्या कमी होणे हेदेखील धोकादायक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
त्याचबरोबर १२६ प्रजातींच्या पक्ष्यांचे प्रमाण स्थिर अथवा वाढत असल्याचे यामध्ये आढळून आले. मात्र गेल्या पाच वर्षांत पक्ष्यांच्या संख्येत तब्बल ७९ टक्के घट झाल्याचे दिसून येते ही धोक्याची बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
No comments:
Post a Comment