Thursday, 27 February 2020

जागतिक मराठी भाषा दिवस

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।

आज 27 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मराठी भाषा दिवस’, मराठी भाषा दिन, ‘मराठी भाषा गौरव दिन’ अशा अनेक नावाने साजरा केला जातो.

मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिना निमित्ताने ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली.

कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरचं अवर्णनीय आहे. आपण मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. याचे महत्त्व आपण पाहू यात.

1999 पासून युनेस्को या जागतिक संस्थेने 21 फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर 21 ते 27 फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके.

📝 *कुसुमाग्रजांचा परिचय* :

▪ 27 फेब्रुवारी 1912 ला जन्म.
▪ 1924 माध्यमिक शिक्षण.
▪ 1932 सत्याग्रहात सहभाग.
▪ 1934 बी.ए.परिक्षा उत्तीर्ण.
▪ 1946 वैष्ण, पहिली कादंबरी.
▪ 1966 ययाति व देवयानी नाटकास राज्य पुरस्कार.
▪ 1970 अध्यक्षपद, मराठी नाट्य संमेलन, कोल्हापूर.
▪ 1974 नटसम्राट नाटकास साहित्य अकादमी पुरस्कार.
▪ 1988 ज्ञानपीठ पुरस्कार.
▪ 1991 पद्मभूषण.
▪ 10 मार्च 1999 कुसुमाग्रजांचे निधन.

🧐 *मराठी भाषेचा इतिहास* :

मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झ़ाला, असे मानले जाते.

देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी मधून लिहिली जाते.

इ.स.1278 मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र लिहिले. त्यानंतर इ.स.1290 मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली.

इ.स.1947 नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स.1960 मध्ये मराठी भाषिकांचा एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला.

No comments:

Post a Comment