Thursday, 20 February 2020

मेसी, हॅमिल्टनला लॉरेयो पुरस्कार

- सहा वेळा ‘फिफा’चा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणारा मेसी हा या पुरस्कारासाठी उपस्थित राहू शकला नाही.

- महिलांमध्ये सिमोन बाइल्स तिसऱ्यांदा सर्वोत्तम खेळाडूची मानकरी

- ब्रिटनचा फॉम्र्युला-वन ड्रायव्हर लुइस हॅमिल्टन आणि महान फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांनी यंदाच्या वर्षांतील सर्वोत्तम क्रीडापटूसाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या लॉरेयो पुरस्कारावर संयुक्तपणे नाव कोरले आहे. २० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच समान मते मिळाल्यामुळे दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

- सहा वेळा ‘फिफा’चा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणारा मेसी हा या पुरस्कारासाठी उपस्थित राहू शकला नाही. या दोघांनी गोल्फपटू टायगर वुड्स, केनियाचा धावपटू इलिड किपचोग, टेनिसपटू राफेल नदाल आणि मोटोजीपी विजेता मार्क मार्केझ यांच्यावर मात करत हा पुरस्कार पटकावला.

- २०१९च्या जागतिक स्पर्धेत पाच सुवर्णपदके मिळवणारी अमेरिकेची जिम्नॅस्ट सिमोन बाइल्स हिने सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला. गेल्या चार वर्षांतील तिचा हा तिसरा पुरस्कार ठरला. याआधी तिने २०१७ आणि २०१९मध्ये सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्कारावर नाव कोरले होते. तिने जमैकाची धावपटू शेली अ‍ॅन-फ्रेसर-प्राइस, टेनिसपटू नाओमी ओसाका, अमेरिकेची अ‍ॅथलीट अ‍ॅलिसन फेलिक्स यांचे आव्हान मोडीत काढले.

- दक्षिण आफ्रिकेच्या रग्बी संघाने जर्गेन क्लॉप यांच्या लिव्हरपूल आणि अमेरिकेच्या महिला फुटबॉल संघावर मात करत लॉरेओ जागतिक सांघिक पुरस्कारावर मोहोर उमटवली. दक्षिण आफ्रिका रग्बी संघाने २०१९मध्ये विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.

🔹 सचिनला सर्वोत्तम क्षणासाठीचा पुरस्कार

- भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने घरच्या मैदानावर आपल्या संघाला २०११चा विश्वचषक जिंकून देण्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. गेल्या २० वर्षांतील हाच लॉरेयो सर्वोत्तम क्रीडाक्षण ठरला आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळालेल्या सचिनला या पुरस्कारासाठी सर्वाधिक मते मिळाली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याच्याकडून सचिनने हा पुरस्कार स्वीकारला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली वानखेडे स्टेडियमवर भारताला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर उचलून मैदानात फेरी मारली होती. हा क्षण चाहत्यांच्या मनावर कोरला गेला आहे.

- हा पुरस्कार माझ्यासाठी संस्मरणीय आहे. या पुरस्काराचा आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही. संपूर्ण देशासाठी खचितच आनंद साजरा करण्याचा क्षण मिळाला आहे. त्यामुळेच क्रिकेट या खेळात किती ताकद आहे, याचा अंदाज आला असेल. २२ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर मी पहिल्यांदाच विश्वचषक उंचावला होता. तो माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण होता.
  – सचिन तेंडुलकर
————————————————--

No comments:

Post a Comment