- डिसेंबर २०२१ पर्यंत काश्मीर उर्वरित भारताशी रेल्वेच्या जाळ्याने जोडणार
- पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत काश्मीर उर्वरित भारताशी रेल्वेच्या जाळ्याने जोडले जाणार आहे. जगातील सर्वात उंचीवरील या रेल्वे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने नवी मुदत निश्चित केली आहे.
- हा रेल्वेमार्ग पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच राहील अशी अपेक्षा आहे. भारतीय रेल्वेच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील हा सर्वात आव्हानात्मक प्रकल्प असल्याचे या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कोकण रेल्वेने म्हटले आहे.
- ‘रेल्वेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासातील हे सर्वाधिक आव्हानात्मक काम आहे. काश्मीरला रेल्वेमार्गाने उर्वरित देशाशी जोडणारा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल’, असे कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
- या पुलाचे बांधकाम म्हणजे स्वातंत्र्यानंतर हाती घेण्यात आलेल्या काश्मीर रेल लिंक प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक भाग आहे. बांधून पूर्ण झाल्यानतंर तो अभियांत्रिकीतील चमत्कार ठरेल, असे गुप्ता म्हणाले.
- अतिशय खडतर अशा भूप्रदेशात उभारल्या जाणाऱ्या कमानीच्या आकारातील या प्रचंड पुलाच्या बांधकामासाठी ५,४६२ टन लोखंड वापरण्यात आले असून, तो नदीच्या पात्रापेक्षा ३५९ मीटर उंचीवर राहणार आहे. ताशी २६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना तोंड देता येईल अशी त्याची रचना आहे. ‘अभियांत्रिकी चमत्कार’ ठरणारा १.३१५ किलोमीटर लांबीचा हा पूल बक्कल (कटरा) व कौरी (श्रीनगर) यांना जोडणार आहे.
- उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग असलेल्या कटरा व बनिहाल दरम्यानच्या १११ किलोमीटरच्या पट्टय़ातील हा पूल म्हणजे महत्त्वाचा दुवा आहे.
- सध्या चीनमधील बेपान नदीवरील २७५ मीटर उंचीवरील शुईबई रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच पूल असून, काश्मीरमधील पूल त्याला मागे टाकणार आहे.
- काश्मीर खोऱ्याला भारतीय रेल्वेच्या जाळ्याशी जोडण्याकरिता, जम्मू व काश्मीरसाठी वाहतुकीची पर्यायी आणि विश्वासार्ह यंत्रणा उपलब्ध करून देण्याकरता उधमपूर- बारामुल्ला- श्रीनगर रेल्वे लिंक प्रकल्प आत्यंतिक महत्त्वाचा आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन, २००२ साली हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प घोषित करण्यात आला होता, अशी माहिती गुप्ता यांनी दिली
---------------------------------------------------
No comments:
Post a Comment