डॉ. केलीन ज्युनियर, सर रॅटक्लिफ आणि ग्रेग सेमेन्झा यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल
- शरीरातील ऑक्सिजन मात्रेतील बदल ओळखून त्यानुसार प्रतिसाद देण्याचे पेशींचे कार्य कसे चालते, हे सिद्ध करून कर्करोग, रक्तक्षय, हृदयविकार यांसह अनेक असाध्य आजारांवर उपचार करण्याचा नवा मार्ग दाखवणाऱ्या संशोधनाला वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
- जगातील हे सर्वोच्च पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना विभागून जाहीर करण्यात आले. त्यापैकी डॉ. विल्यम जी. केलीन ज्युनियर आणि सर पीटर जे. रॅटक्लिफ हे अमेरिकी, तर ग्रेग एल. सेमेन्झा हे ब्रिटिश आहेत. सुमारे ९ दशलक्ष क्रोनर म्हणजे नऊ लाख १८ हजार अमेरिकी डॉलर असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
- पण जिवंत राहण्याची पेशीप्रक्रिया कशी चालते याबद्दलच्या आमच्या ज्ञानात या संशोधनाने मोलाची भर घातली आहे,’’ अशा शब्दांत नोबेल समितीने तिन्ही संशोधकांच्या या क्रांतिकारी संशोधनाचा गौरव केला. शरीरातील बदलत्या ऑक्सिजन मात्रेला प्रतिसाद देण्याची जनुकांची क्रिया नियमित करणारी ‘जीवशास्त्रीय यंत्रणा’च या संशोधकांनी शोधली आहे, असे गौरवोद्गारही नोबेल समितीने काढले.
▪️या संशोधनामुळे शास्त्रज्ञांनी
- आता आजारांवर उपचार करण्यासाठी शरीराची ‘ऑक्सिजन संवेदन यंत्रणा’ सक्रिय करणारी किंवा बंद करणारी औषधे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही नोबेल समितीने म्हटले आहे.
- शरीरातील ऑक्सिजनच्या बदलत्या प्रमाणाशी पेशी कसे जमवून घेतात यावर प्रकाश टाकणारे हे संशोधन आहे. ऑक्सिजनच्या उपलब्धतेनुसार जनुकांची क्रिया नियंत्रित करणारी जीवशास्त्रीय यंत्रणा या तिघांनी शोधून काढली.
- या मूलभूत संशोधनात मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या पेशी प्रक्रियांवर प्रकाश पडला आहे. शरीरातील ऑक्सिजनची पातळी चयापचय आणि अन्य शारीरिक क्रियांवर कसा परिणाम करते याचा उलगडाही झाला आहे.
▪️ सर पीटर जे. रॅटक्लीफ
जन्म १९५४, लँकेशायर, ब्रिटन गॉनव्हिले व कॉयस कॉलेज या केंब्रिज विद्यापीठाच्या संस्थांत वैद्यकशास्त्राचा अभ्यास. मूत्रपिंड विकारशास्त्रात ऑक्सफर्डमध्ये संशोधन. लुडविग इन्स्टिटय़ूट ऑफ कॅन्सर रीसर्च संस्थेचे सदस्य, ऑक्सफर्डमधील टार्गेट डिस्कव्हरी इन्स्टिटय़ूटचे संचालक.
▪️ग्रेग एल. सेमेन्झा
जन्म १९५६, न्यूयॉर्क, हार्वर्ड विद्यापीठातून जीवशास्त्रात बीए. पेनसिल्वानिया विद्यापीठातून पीएचडी, डय़ूक विद्यापीठातून बालरोगतज्ज्ञ, जॉन हॉपकिन्स संस्थेत संशोधन, व्हॅस्क्युलर रीसर्च प्रोग्रॅमचे संचालक.
▪️विल्यम ज्युनियर
जन्म १९५७, न्यूयॉर्क, अमेरिका एमडी, डय़ूक विद्यापीठ, डय़ुरहॅम. कर्करोगशास्त्रात जॉन हॉपकिन्स विद्यापीठ तसेच डॅना फार्बर कर्करोग संस्थेत संशोधन. हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये प्राध्यापक. हॉवर्ड ह्य़ूजेस संस्थेत संशोधन.
▪️संशोधन काय?
पेशींना जिवंत ठेवणारा ऑक्सिजन हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळेच ऑक्सिजनला आपण प्राणवायू म्हणतो. शरीरातील ऑक्सिजनची मात्रा खूप कमी आणि खूप जास्त होणे घातक ठरते. शरीरातील प्राणवायूच्या मात्रेतील बदल ओळखण्याची आणि त्यानुसार प्रतिसाद देण्याची पेशींची प्रक्रिया कशी चालते, हे या संशोधकांनी शोधल्याने प्राण्यांचे जगणे म्हणजे नेमके काय, या मूलभूत प्रश्नाचे उत्तर मिळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर पेशींची ऑक्सिजनच्या बदलत्या मात्रेला प्रतिसाद देण्याची प्रक्रिया मंद करणारी किंवा सक्रिय करणारी औषधेही विकसित करण्यात येतील. म्हणजे एखाद्या आजारात शरीरातील ऑक्सिजन मात्रा कमी पडत असेल, तर पेशींची प्रतिसाद प्रक्रिया सक्रीय करण्यासाठी औषधांची निर्मिती करणे शक्य होईल. त्यामुळे कर्करोग, रक्तक्षयासारख्या आजारांवर नवी परिणामकारक औषधांची निर्मिती होऊ शकेल.
शरीरातील ऑक्सिजनच्या बदलत्या मात्रेला प्रतिसाद देण्याची जनुकांची क्रिया नियमित करणारी ‘जीवशास्त्रीय यंत्रणा’च या संशोधकांनी शोधली आहे. या संशोधनामुळे अनेक असाध्य आजारांवर उपचार करणारी नवी औषधे आता विकसित होत करण्यात येत आहेत.