📚 स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने इतिहासाचा अभ्यास करताना हडप्पा संस्कृतीला ओलांडून पुढे जाता येत नाही. परीक्षेत प्राचीन भारताच्या इतिहासात या अनुषंगाने प्रश्न विचारले जाऊ शकतात.
👉 या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला 'हडप्पा संस्कृती' असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात.
🕰 *कालखंड :* हि संस्कृति ताम्रयुगातील मानली जाते. संशोधकांच्या मते हि संस्कृति सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीची आहे. इ.स. पूर्व 3500 ते इ.स. पूर्व 2600 हा कालखंड प्रारंभिक हडप्पा संस्कृतीचा तसेच इ.स. पूर्व 2600 ते 2800 हा कालखंड परिक्पव हडप्पा संस्कृतीचा होता.
🔍 *संस्कृतीचा शोध :* इ.स. 1920 च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये शोधला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले. राखालदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदडोचा शोध लावला. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली विस्तृत उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले.
🗓 *कालमापनानुसार कालखंड :* या संस्कृतीच्या कोटदिजी, हडप्पा, लोथल इ. स्थळांचा कालखंड कार्बन-14 पद्घतीनुसार निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार आणि मोहेंजोदडो व हडप्पा येथे सापडलेल्या काही अवशेषांच्या व मध्यपूर्वेतील विशेषतः मेसोपोटेमियातील अवशेषांच्या तुलनात्मक अभ्यासानुसार तसेच आतापर्यंत झालेल्या उत्खननांवरुन सिंधु संस्कृतीचे स्थूलमानाने तीन कालखंड पडतात :
*1. आद्य सिंधू* (इ. स. पू. 3200 – 2600),
*2. नागरी सिंधू* (इ. स. पूर्व 2600 – 2000) आणि
*3. उत्तर सिंधू* (इ. स. पूर्व 2000 – 1500)
📍 *सुरुवात व ऱ्हास :* आद्य सिंधु कालखंडातील स्थळे सिंधपासून सरस्वतीच्या खोऱ्यात अधिक आहेत. नागरी सिंधू काळातील पुराव्यांचा विचार करता या काळात वेगाने सांस्कृतिक बदल घडून आले; तर उत्तर सिंधू काळात सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासास सुरुवात झाली
हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये*
💁♂ हडप्पा संस्कृतीच्या व्याप्तीइतकीच या संस्कृतीची प्राचीनताही लक्षात ठेवण्यासारखी आहे. हि संस्कृती सर्वात प्राचीन व विकसित संस्कृती होती. तिची वैशिष्टये पाहुयात
▪ *नगररचना :* हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे, जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते. हडप्पाकालीन नगराची विभागणी प्रशासकीय इमारती व लोकवस्ती अशा दोन घटकांत करण्यात आलेली होती. शहराच्या लोकवस्तीचा भाग बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे किंवा जाळीप्रमाणे विविध प्रभागांमध्ये विभागला होता. नगर बांधणीसाठीच्या विटा 4:2:1 (लांबी:रुंदी:उंची) या प्रमाणातच असत.
▪ *घरे :* हडप्पा संस्कृतीत प्रत्येक प्रभागात 20 ते 30 घरे असत. ती पक्क्या विटांची असून प्रशस्त होती. प्रत्येक घरामध्ये स्नानगृह(बाथरूम) असे. काही घरांच्या परसात विहिरी आढळल्या आहेत. घरांच्या मध्यभागी, जसे आजही वाड्यांच्या व इतर भारतातील पारंपरिक घरांमध्ये असते, तसे.अंगण असे. घरे एक किंवा दोन मजली असत.
▪ *तटबंदी :* हडप्पाकालीन नगरांना संरक्षक तटबंदी असे. तटबंदी रुंद असून तिचे बांधकाम पक्क्या विटांचे असे. तटबंदीला बुरूज होते. यावरून हडप्पा संस्कृतीने नगराच्या संरक्षणाकडे लक्ष दिल्याचे दिसते.
▪ *रस्ते :* शहराच्या प्रभागाकडून जाणारे रस्ते मुख्य रस्त्यांना जोडलेले असत. रस्ते पुरेसे रुंद असून ते एकमेकांना काटकोनांत छेदणारे होते. रस्त्यांच्या कडेला सापडलेल्या लाकडांच्या अवशेषांवरून रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय असावी असे दिसते.
▪ *सांडपाण्याची व्यवस्था :* हडप्पा संस्कृतीत सांडपाणी व पावसाचे पाणी गावाबाहेर वाहून नेण्यासाठी एक मीटर खोल भुयारी गटारांची व्यवस्था होती. ही गटारे दगड व पक्क्या विटांनी बांधलेली होती. कोणत्याही समकालीन संस्कृतीमध्ये न आढळणारी सांडपाण्याची व्यवस्था हडप्पा संस्कृतीत पाहावयास मिळते.
▪ *महास्नानगृह :* मोहनजोदडो येथे सार्वजनिक स्नानगृहे होती. येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर आणि खोली 2.5 मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती 7 ते 8 फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. स्नानगृहाचे वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती. यावरून हडप्पा संस्कृतीतील लोक आरोग्याबाबत किती दक्ष होते हे दिसून येते.
💁♂ *समाजरचना :* हडप्पा संस्कृतीत कुटुंबसंस्था महत्त्वाची होती. नगररचनेच्या अवशेषांवरून समाजात राज्यकर्त्यांचा वर्ग, व्यापारी वर्ग व सर्वसामान्यांचा वर्ग असल्याचे दिसते. नद्यांच्या काठी सुपीक प्रदेशात ही संस्कृती विकसित झालेली असल्याने शेती हा समाज जीवनाचा मुख्य भाग होता.
💃 *वेशभूषा-केशभूषा :* हडप्पा संस्कृतीमधील मातीच्या भांड्यांवर मिळालेले कापडाचे ठसे, मृण्मयमूर्तीवर दाखवलेले वस्त्र, उत्खननात मिळालेल्या विविध आकारांच्या सुया यावरून लोकांना वेशभूषेचे ज्ञान असल्याचे समजते. तसेच तत्कालीन मूर्तींवरून केशभूषेची माहिती मिळते. पुरुष दाढी कोरत, मधोमध भांग पाडत तर स्त्रिया विविध प्रकारची केशरचना करत.
💄 *सौंदर्यप्रसाधने :* हडप्पाकालीन संस्कृतीच्या उत्खननात एक शृंगारपेटी मिळाली. यामध्ये आरसे, हस्तिदंती कंगवे, केसासाठी आकडे, पिना, ओठ व भुवया रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगाच्या कांड्या मिळाल्या. हडप्पाकालीन लोकांना सौंदर्यप्रसाधनांप्रमाणेच अलंकाराची आवड होती. उत्खननामध्ये मण्यांचे व सोन्याचे हार, बांगड्या, अंगठ्या, वाक्या, कमरपट्टा इत्यादी अलंकार मिळाले तसेच नर्तकीचा ब्राँझचा पुतळा मिळाला.
🎲 *करमणुकीची साधने :* हडप्पाकालीन लोकांची सोंगट्या, फासे ही करमणुकीची साधने होती. नृत्य, गायन, शिकार व प्राण्यांच्या झुंजी इत्यादींमधून करमणूक केली जाई. लहान मुलांसाठी भाजक्या मातीची सुबक खेळणी बनवली जात असे. डोक्याची पुढेमागे हालचाल करू शकणारा बैल, बैलगाडी, पक्ष्यांच्या अाकाराच्या शिट्या, खुळखुळे इत्यादींचा यात समावेश होतो.
⛪ *धर्मकल्पना :* लोकांची प्रामुख्याने शेतीवरती उपजीविका असल्याने लोक भूमातेस मातृदेवता मानत. त्यांच्या धार्मिक जीवनात निसर्गशक्तीस महत्त्वाचे स्थान होते. सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची ते पूजा करत. कालिबंगन येथे सापडलेल्या अग्निकुंडावरून ते अग्निपूजा करत असल्याचे दिसते. निसर्गदेवतेप्रमाणेच पशुपती, नाग, वृषभ म्हणजे बैल यांचीही ते पूजा करत होते. लोक मूर्तिपूजक होते, मात्र हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळली नाहीत. तेथील लोक मृतदेहाचे विधिपूर्वक दफन करत. दफन करतेवेळी त्यांच्या सोबत अलंकार व भांडी ठेवली जात.
🥗 *आहार :* लोकांचा प्रमुख आहार गहू होता. त्याचबरोबर जव, तीळ, वाटाणा, यांसारखी धान्ये सुद्धा पिकवीत असत. खजुराचा उपयोगही ते अन्न म्हणून करीत असत. येथील लोक दुधासाठी जनावरेही पळत असल्याचं पुराव्यावरून सिद्ध झालं आहे.
🧸 *खेळणी :* मुलांच्या खेळण्यात हत्ती, निरनिराळे प्राणी, तसेच चाकांच्या मातीच्या गाड्या इ. आढळून आल्या. त्यामुळे प्रत्यक्षात वाहतुकीला योग्य अशा गाड्या अस्तित्वात असाव्यात असा तर्क केला जातो.
📐 *वजन आणि मापे :* येथील लोक अनेक प्रकारच्या वजनांचा उपयोग करीत. त्यांत दोराने उचलण्याच्या वजनापासून ते सोनाराने उपयोगात आणलेल्या लहानशा वजनापर्यंतचा समावेश होता.वजन माप हे 16 च्या पटितील होते. 0.8565 हे वजन कमीत कमी होते व 274.938 हे जास्तीत जास्त होते.
🏠 *घरगुती उपकरणे :* कुंभाराच्या चाकावर बनवलेली सुंदर मातीची भांडी येथे आढळली. त्यांवर नक्षीकाम केलेले होते. याशिवाय तांबे, ब्रांझ आणि चांदीची भांडी सापडली, परंतु याचे प्रमाण मात्र अत्यल्प होते.
🚢 *जहाजाची गोदी :* लोथल येथील उत्खननामध्ये एका प्रचंड गोदीचे अवशेष सापडले. या गोदीची लांबी 270 मीटर तर रुंदी 37 मीटर आहे. या गोदीवरून जहाजबांधणी, व्यापार, व्यापारीमार्ग यांची माहिती या संस्कृतीमधील लोकांना होती असे दिसून येते. येथे सापडलेल्या एका मुद्रेवर जहाजाचे चित्र कोरले आहे. तसेच लोथल येथे पक्क्या विटांनी बांधलेली धान्य कोठारे सापडली आहेत. यावरून कृषी व व्यापार क्षेत्रातील त्यांची प्रगती लक्षात येते.
📶 *समाजरचना :* हडप्पा संस्कृतीत कुटुंबसंस्था महत्त्वाची होती. नगररचनेच्या अवशेषांवरून समाजात राज्यकर्त्यांचा वर्ग, व्यापारी वर्ग व सर्वसामान्यांचा वर्ग असल्याचे दिसते. नद्यांच्या काठी सुपीक प्रदेशात ही संस्कृती विकसित झालेली असल्याने शेती हा समाज जीवनाचा कणा होता.