(जन्म: २३ जुलै १९०६-मृत्यु: २७ फेब्रुवारी १९३१)
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतीकारक होते. रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्युनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशन या क्रांतीकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशिएशन या नवीन नावाखाली पुनर्बाधणी केली. त्याचप्रमाणे त्यांना भगतसिंग यांचे गुरु मानले जाते.
जन्म आणि बालपण:
चंद्रशेखर यांचा जन्म २३ जुलै १९०६ ला सध्याच्या अलीराजपुर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी आणि आईचे नाव जगरानी देवी होते. त्यांचे पूर्वज कानपूर जवळच्या बदरखा गावात राहत होते. जगरानी देवी ह्या सीताराम यांच्या तिसर्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरीत झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसीमधील संस्कृत शाळेत गेले. डिसेंबर १९२१ मध्ये महात्मा गांधीनी सुरु केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चन्द्रशेखरने सहभाग घेतला. त्यासाठी त्याला अटक सुद्धा झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव आझाद असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते आझाद आडनावाने ओळखले जाऊ लागले.
मृत्यु:
२७ फेब्रुवारी १९३१ ला अलाहाबादमधील अल्फ्रेड पार्क येथे सुखदेव राज या क्रांतीकारकाला भेटायला गेले असताना एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला आणि चंद्रशेखर व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपत आल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे ठेवण्यात आले.
---------------------------------------------------------------------