Monday, 23 December 2019

मडगाव येथे ‘आदि महोत्सवा’ला सुरुवात

☑️रवींद्र भवन, मडगाव येथे आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार तर्फे आयोजित ‘आदि महोत्सवा’चे काल उद्घाटन करण्यात आले. आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत काम करणाऱ्या ‘भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित’ (TRIFED) या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महासंघ आदिवासी शिल्पे, कलाकारी व इतर उत्पादने यांच्या विपणनाचे काम बघतो. या महासंघाचे अध्यक्ष रमेश चंद मीना यावेळी उपस्थित होते.

☑️रवींद्र भवन, मडगाव येथे 20 ते 30 डिसेंबर या दरम्यान हा महोत्सव सर्व गोवेकारांसाठी खुला असून, अधिकाधिक संख्येने गोवेकरांनी या महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या महोत्सवाच्या पार्शवभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रमेश चंद मीना यांनी आपले मनोगत व्यक्त केले. देशातील आदिवासी जमातींना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर परिचित करून देणे, हा आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

☑️2011च्या जनगणनेनुसार देशातील 12 कोटी आदिवासी कुटुंबांना रोजगार मिळवून देणे, हा पंतप्रधानांचा मानस असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. पारंपरिक ज्ञान, वनौषधी यांना आधुनिक वैद्यक शास्त्रात विश्व मानव कल्याणासाठी स्थान मिळवून देणे, यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. तीन वर्षात महासंघाचा विक्री व्यवसाय 10 कोटी वरून 60 कोटी वर गेला असून, येणाऱ्या पाच वर्षात विक्री दोनशे ते पाचशे कोटी करण्याचा महासंघाचा प्रयत्न आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच महासंघ सध्या देशातील एक लाख आदिवासी बांधवांसोबत काम करत आहे, पुढील तीन वर्षांत ही संख्या 10 लाख व्हावी, अशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

☑️‘भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित’च्या दक्षिण विभागचे क्षेत्रीय व्यवस्थापक रामनाथन यांनी महासंघाच्या कामाची माहिती यावेळी दिली. महासंघ आदिवासी कलाकारांना वेळोवेळी विपणन मंच उपलब्ध करून देतो त्यासह प्रशिक्षण देखील देत असतो, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देशभरात 120 शोरुममध्ये आदिवासी उत्पादने प्रदर्शित व विक्री केली जात आहेत. पैकी दाबोळी विमानतळावरील शोरुम त्याचाच एक भाग आहे; गोवा राज्याकडे पणजी तसेच मडगाव येथे शोरुमकरिता जागा मागितली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

☑️महोत्सवातून आदिवासींना प्रत्यक्ष ग्राहकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळत असते, हे नमूद करताना ते म्हणाले की, पुढील आदी महोत्सवात गोव्यातील आदिवासी बांधवांना सामील करून घेण्यासंबंधी प्रक्रिया सुरू आहे

No comments:

Post a Comment