🔺 ब्रिटनमध्ये आताच्या निवडणुकीनंतर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १५ खासदार प्रवेश करणार आहेत.
👉 पीटीआय | December 14, 2019
हुजूर पक्षाच्या भारतीय वंशाच्या नेत्या आणि गृहमंत्री प्रिती पटेल.
◾️लंडन : ब्रिटनमध्ये आताच्या निवडणुकीनंतर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १५ खासदार प्रवेश करणार आहेत. सत्ताधारी हुजूर व विरोधी मजूर पक्षाकडून काही भारतीय वंशाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यात अनेक खासदारांनी आपले मतदारसंघ राखण्यात यश मिळवले असून भारतीय वंशाचे एकूण १५ खासदार नव्या सभागृहात असणार हे उघड झाले आहे.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आताच्या निवडणुकीत नेत्रदीपक विजय संपादन केला असून आतापर्यंत सर्वात जास्त विविधता असलेले सभागृह अस्तित्वात येत आहे. त्यात वांशिक अल्पसंख्याक असलेले १० खासदार आहेत. आधीच्या संसदेतील सर्वच खासदार पुन्हा यशस्वी झाले आहेत. गगन मोहिंद्रा व श्रीमती क्लेअर काँटिन्हो यांनी हुजूर पक्षाच्या वतीने बाजी मारली तर लिबरल डेमोक्रॅटसचे मुनिरा विल्सन व नवेंद्रु मिश्रा प्रथमच निवडून आले आहेत. विल्सन यांनी सांगितले की, आताच्या सभागृहात विविधता असणार आहे. त्यातून सर्वाचा आवाज उमटेल. मूळ गोवेकर असलेल्या काँटिन्हो यांनी सांगितले की, ब्रेग्झिट पूर्ण करण्याची ही वेळ आहे. त्याचबरोबर शाळा, रुग्णालये, पोलीस दल यात गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे. काँटिन्हो यांनी सरे पूर्व भागातून विजय मिळवला तर मोहिंद्रा यांनी हर्टफोर्ड शायर (नैऋत्य) मतदारसंघातून विजय संपादन केला. सत्ताधारी पक्षाच्या खासदार व माजी गृहमंत्री प्रीती पटेल यांनी आरामात विजय मिळवला त्या नवीन मंत्रिमंडळात पुन्हा गृहमंत्री राहतील अशी शक्यता आहे.
पटेल यांनी सांगितले की, अतिशय अटीतटीच्या या निवडणुकीत आम्हाला कार्यात्मक बहुमत गरजेचे होते. आम्ही आमच्या अग्रक्रमांबरोबरच ब्रेग्झिटच्या पूर्ततेला महत्त्व देतो. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई व आधीच्या मंत्रिमंडळातील मंत्री ऋषी सुनाक, आंतरराष्ट्रीय विकास मंत्री आलोक शर्मा हे विजयी झाले. शैलेश वारा यांनी वायव्य केंब्रिजशायरमधून विजय मिळवला. गोवेकर वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन यांनी फेअरहॅममधून मिळालेल्या यशाबद्दल मतदारांचे आभार मानले.
स्टॉकपोर्ट येथून नवेंद्रु मिश्रा निवडून आले तर गेल्या निवडणुकीत पहिल्या महिला ब्रिटिश शीख खासदार ठरलेल्या प्रीती गौर गिल यांनी पुन्हा विजय मिळवला. पहिले पुरूष शीख खासदार तन्मनजीत सिंह धेसी यांनीही पुन्हा यश मिळवले. ज्येष्ठ खासदार वीरेंद्र शर्मा, लिसा नंदी, कीथ वाझ यांची बहीण व्हॅलेरी वाझ विजय झाल्या.
📘थोडा इतिहास..
१९३५ नंतर प्रथमच मजूर पक्षाची कामगिरी उत्तर इंग्लंडमध्ये खराब झाली. जून २०१६ मध्ये युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठी कौल मिळाल्यानंतरची ही दुसरी निवडणूक होती. जॉन्सन यांनी थेरेसा मे यांच्याकडून याच वर्षी सूत्रे हाती घेतली होती. पण ३१ ऑक्टोबरची ब्रेग्झिट मुदत त्यांना पाळता येत नसल्याने ते अडचणीत आले. ब्रेग्झिटसाठी त्यांना हाऊस ऑप कॉमन्समध्ये बहुमताची गरज होती त्यामुळे त्यांनी मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या यात पुन्हा त्रिशंकू स्थिती होईल असे अंदाज होते.
🇮🇳भारतीय समुदायाकडून जॉन्सन यांच्या विजयाचे स्वागत
ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या यशाचे तेथील भारतीय समुदायाने स्वागत केले आहे. विरोधी मजूर पक्षाने काश्मीर प्रश्नाचे निमित्त करून भारताविरोधात भूमिका घेतल्याने भारतीय समुदायाच्या लोकांनी या निवडणुकीत बरीच क्रियाशीलता दाखवली होती. त्याचा परिणाम म्हणून मजूर पक्षाला भारतीय बहुल मतदारसंघात मोठा फटका बसला आहे.
ब्रिटनच्या संसदेत ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावरून जो तिढा निर्माण झाला होता तो दूर करण्यासाठी पंतप्रधान जॉन्सन यांनी जुलैच्या सुमारास मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली होती. ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावर तोडगा काढण्याचा संदेश भारतीय समुदाय व इतर मतदार यांच्यापर्यंत पोहोचला होता असाच या विजयाचा अर्थ असल्याचे भारतीय समुदायातील लोकांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment