Tuesday, 5 November 2019

ISROची अंतरीक्स कॉर्पोरेशन कंपनी भारताच्या ‘NavIC’ या स्वदेशी GPSला व्यवसायिक स्वरूप देणार

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भारतासाठी ‘NavIC’ नावाने स्वदेशी सुचालन प्रणाली तयार करीत आहे.

NavIC म्हणजे नॅव्हिगेशन वीथ इंडियन कॉन्स्टीलेशन (NAVigation with Indian Constellation - NavIC) होय.

या प्रणालीच्या उपग्रहांची शृंखला भारताने यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केलेली आहे. आता या सेवेला व्यवसायिक स्वरूप देण्यासाठी त्यादृष्टीने, अंतरीक्स कॉर्पोरेशन (Antrix Corporation) लिमिटेड ही ISROच्या व्यवसायिक शाखा योजना तयार करीत आहे.

‘NavIC’ प्रणाली

‘NavIC’ प्रणाली ही ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (GPS) सेवेप्रमाणेच आहे. भारताकडून ‘NavIC’ या नावाने ‘भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणाली (रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम - IRNSS)’ उभारण्यासाठी एकूण सात उपग्रहांचा वापर केला जाणार आहे. दोन उपग्रह तांत्रिकदृष्ट्या अकार्यक्षम ठरल्यामुळे ते पाठवण्यात आले नाहीत त्यामुळे एकूण नऊ उपग्रह तयार केले गेलेत.

IRNSS उपग्रहांना पृथ्वीच्या उप-भौगोलिक समांतर कक्षेत (sub-GTO) प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यातला आठवा IRNSS-1H हा खासगी कंपन्यांकडून तयार करण्यात आलेला आणि सक्रियपणे पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आलेला भारताचा पहिला उपग्रह आहे.

IRNSS दोन प्रकारच्या सेवा प्रदान करणार - सर्व वापरकर्त्यांसाठी स्टँडर्ड पोजिशनिंग सर्व्हिस (SPS) आणि केवळ अधिकृत वापरकर्त्यांसाठी रेस्ट्रीक्टेड सर्व्हिस (RS). 

ही प्रणाली भारताच्या सर्व बाजूंनी सुमारे 1500 किलोमीटरच्या सीमेच्या आत कार्य करणार. ही प्रणाली वापरकर्त्या संस्थेला रस्त्यावर आणि समुद्रात त्यांचे वाहन चालविण्यासाठी योजनेची आखणी करण्यास आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करणार.

आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडनार्‍या मच्छीमारांना याद्वारे सावध केले जाऊ शकते आणि लोकांना त्यांना आवश्यक असलेला पत्ता शोधण्यास मदत होऊ शकणार. शिवाय दूरसंचार आणि पॉवर ग्रीड कार्यामध्येही याची मदत होऊ शकते. एकूणच भारताच्या दळणवळण क्षेत्रात हा अमुलाग्र टप्पा असणार आहे.

ISRO विषयी

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.

ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केला. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पाहिल्यादा प्रक्षेपित करण्यात आला. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रायान-1’ मोहीम यशस्वी झाली. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.

अंतरीक्स कॉर्पोरेशन (Antrix Corporation) लिमिटेड, बेंगळुरू ही अंतराळ विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली भारत सरकारच्या संपूर्णपणे मालकीची कंपनी आहे. ही ISROने विकसित केलेल्या अंतराळ उत्पादने, तांत्रिक व सल्लागार सेवा आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण अश्या सुविधांचे व्यवसायिकीकरण करण्यासाठी ISROची विपणन शाखा आहे. त्याची स्थापना 28 सप्टेंबर 1992 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय बेंगळुरू या शहरात आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...