भारताच्या भूमिकेला अमेरिकेचा पाठिंबा
वॉशिंग्टन : चीनच्या वन बेल्ट, वन रोड (ओबीओआर) प्रकल्पाला भारताने विरोध केला असून भारताच्या या भूमिकेला अमेरिकेने पाठिंबा दर्शविला आहे.
अब्जावधी डॉलरच्या या प्रकल्पामागील आर्थिक गणिताच्या तर्कसंगतीवर प्रश्न उपस्थित करताना भारताने व्यक्त केलेली चिंता योग्य असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि त्यामधून चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका प्रकल्प जाणार असल्याने प्रांतीय सार्वभौमत्वाच्या मुद्दय़ावर ओबीओआर प्रकल्पाला विरोध करणारा भारत हा एकमेव मोठा देश आहे.
ओबीओआर हा चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा आवडता प्रकल्प असून त्याद्वारे आशियाई देश, आफ्रिका, चीन आणि युरोप यांच्यातील संपर्कता आणि सहकार्य यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
*‘सीपीईसी’बाबत पाकिस्तानने चीनला प्रश्न विचारावेत; ट्रम्प प्रशासनाची सूचना*
वॉशिंग्टन : चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेबाबत (सीपीईसी) पाकिस्तानने चीनला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारावे, अशी सूचना डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला केली आहे.
सीपीईसी ही रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा प्रकल्पांची योजना असून त्याद्वारे चीनमधील नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेला झिनजिआंग उघ्यूर स्वायत्त प्रांत आणि पाकिस्तानमधील गदर बंदर जोडले जाणार आहे.
‘‘कर्ज, विश्वासार्हता, पारदर्शकता याबाबत पाकिस्तान चीनवर अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नांची सरबत्ती करील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. पाकिस्तानमध्ये चीनच्या विकासाच्या नमुन्याचा पाठपुरावा का केला जात आहे, सीपीईसी प्रकल्पाच्या खर्चाचा आकडा किती आहे याची पाकिस्तानातील जनतेला माहिती का नाही’’, असा सवाल दक्षिण आणि मध्य आशियाच्या प्रधान उपसाहाय्यक परराष्ट्रमंत्री एलीस वेल्स यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment