मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलं नाही, त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच नवं सरकार बनविणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांची विरोधाभास असलेली आघाडी त्यांनाच लखलाभ असो, असा टोलाही मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला.
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवलं होतं. त्यामुळे अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एक गट आमच्याकडे आल्याने आम्ही त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार बनवले. आज सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश आम्हाला दिले. मात्र, आज सकाळी अजित पवार मला भेटले आणि त्यांनी काही कारणामुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं. अजित पवार यांनी माझ्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ उरले नसल्याने मीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच वेळात राज्यपालांना भेटून मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
No comments:
Post a Comment