टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकाराच्या नऊ लढतींपैकी अखेरच्या पाच लढतींमध्ये फक्त एक गुण कमावणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी पात्र होण्यात अपयश आले.
मॅग्नस कार्लसनने मात्र वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर एकूण विक्रमी २७ गुणांसह जेतेपदावर नाव कोरले. वर्षांच्या पूर्वार्धात अबिदजान (आयव्हरी कोस्ट) येथे झालेल्या स्पर्धेत कार्लसनने २६.५ गुण मिळवले होते. तो विक्रम कार्लसनने मोडीत काढला. अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने २३ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर वेस्ली सो (अमेरिका) आणि अनिश गिरी (नेदरलँड्स) या दोघांनी प्रत्येकी १८.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.
भारताच्या आनंदला १६ गुणांसह सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर पी. हरिकृष्णा आणि विदित गुजराथी यांना प्रत्येकी १४.५ गुणांसह आठवे स्थान मिळाले. आनंदला पात्रतेसाठी दीड गुण कमी पडले. लंडन येथे होणाऱ्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी कार्लसन, डिंग लिरेन, अरोनिय, मॅक्झिमे व्हॅचिएर-लॅग्रॅव्ह पात्र ठरले आहेत.
No comments:
Post a Comment