भौगोलिक माहिती :-
सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४,८४४.६ चौरस किलोमीटर आहे.सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५.४ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्याचा ) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदीजिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.
सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस सांगली, सातारा व पुणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्र्चिम व नैर्ऋत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे, तसेच थोडे विषमही आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते.
जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमासंगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.
सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी(१२१ टी. एम. सी ) येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्र्चिम व मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो(हा स्थलांतरित पक्षी ) (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम प्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो.
No comments:
Post a Comment