Sunday, 5 December 2021

डासांमुळे होणारे आजार

1-मलेरिया
2-चिकुनगुनिया
3- डेंग्यू
4-हत्तीरोग

1) मलेरिया :-

🔹मलेरियावर औषधे व प्रतिबंधक उपाय आज पुरेसे सापडले आहेत; पण मलेरियामुळे वाया जाणारे मानवी श्रममूल्य, श्रमतास यांमध्ये मात्र फार फरक पडलेला नाही. मेंदूपर्यंत पोहोचलेला मलेरियाचा आजार (सेरेब्रल मलेरिया) झाल्यास रोगी दगावण्याची शक्यता आजही अगदी अद्ययावत रुग्णालयांतील अतिदक्षता उपचारकेंद्रात असते.
   
🔹 क्लोरोक्विन व तत्सम औषधांचा शोध व वापर सुरू झाला. प्रतिबंधक उपाय म्हणूनही क्लोरोक्विनच्या गोळ्या दर आठवड्याला दिल्या जाऊ लागल्या आणि मलेरियाचा घातकपणा कमी झाला. मात्र आजही पाणवठ्याजवळच्या जागा, दलदलीचा प्रदेश, जंगले येथे मलेरियाचा प्रभाव आढळतो.

2) चिकणगुणिया  :-

🔹स्वच्छ पाण्यात वाढणारे डास चिकुनगुनिया व डेंग्यू हे आजार पसरवतात. घरात, घराच्या आसपास साचलेल्या व ठेवलेल्या पाण्यातसुद्धा या डासांची वाढ होऊ शकते. फुलदाणीतील न बदललेले पाणी, बाल्कनीतील प्लास्टिकच्या भांडय़ांत, जुन्या टायरमध्ये साचलेले पावसाचे पाणी, गच्चीतील उघडी पाण्याची टाकी यांमध्ये हमखास या रोगांच्या वाहक डासांची निर्मिती होते. एडिस इजिप्ती जातीचा डास सहसा दिवसा चावतो. त्याच्या चाव्यातून या आजारांचे विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात.

🔹चिकनगुनिया म्हणजे हातापायांची बोटे व सांधे वेडेवाकडे होणे. हा आफ्रिकन भाषेतील शब्द आहे. त्याचा चिकन म्हणजे कोंबडय़ांशी वा बर्डफ्लूशी काहीही संबंध नाही. तीव्र ताप, अंग दुखणे, डोकेदुखी, क्वचित त्वचेवर लालसर पुरळ, डोळ्यांमधून पाणी येणे व डोळेही लाल होणे या प्राथमिक लक्षणानंतर चिकनगुनिया खरा प्रभाव दाखवतो.

🔹शरीरातील लिम्फॅटिक म्हणजेच रसवाहिका व कोशग्रंथी यांद्वारे विविध सांध्यांमध्ये पसरलेल्या दाहामुळे अनेक सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज दिसते. काही वेळा पायांवर सूज येऊ लागते. रुग्णाला हालचाल करणे देखील कठीण होते. अन्नपाणी नकोसे वाटते. त्यातून अशक्तपणा वाढतो. ताप उतरला, तरी काही आठवडे वा वयस्कर माणसांत काही महिनेसुद्धा या तक्रारी चालू राहतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या आजारावर वेदनाशामकांपलीकडे कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. क्वचित प्रसंगी हा आजार शरीरातील प्रमुख इंद्रियांच्या कामात अडथळा निर्माण करतो, तेव्हा रुग्णावर तातडीचे उपचार रुग्णालयात भरती होऊनच करावे लागतात.

3) डेंग्यू  :-
   
🔹डेंग्यू व इन्फ्लुएंझा यांची लक्षणे खूपशी सारखी असल्याने अनेकदा गल्लत होऊ शकते. पण फ्ल्यूचा ताप सहसा तीन ते पाच दिवसांत उतरतो व तो सहसा साथीचा असतो. डेंग्यू डास चावल्यामुळे होतो. स्वच्छ पाण्यात वाढणार्‍या एडीस अल्बोपिक्टस, इजिप्ती या जातींच्या डासांचा या आजाराच्या प्रसारात सहभाग असतो. ताप, डोकेदुखी, सांधे दुखणे, भूक मंदावणे या लक्षणांबरोबर डेंग्यूच्या मोजक्याच रुग्णांत अचानक रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स यांची संख्या कमी होऊ लागते. 

मानवी प्रतिकारक्षमता पांढऱ्या पेशींवर अवलंबून असल्याने रुग्णाची तब्येत गंभीर होऊ लागते. प्लेटलेट्समुळे रक्तस्राव बंद करणे हे कार्य पार पाडले जाते. विविध इंद्रियांत अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. यातून डेंग्यूचा गंभीर रुग्ण दगावू शकतो.

🔹 रक्तघटक पुरवून अशा रुग्णांवर उपचार केले जातात. डेंग्यूवरसुद्धा उपचार वा प्रतिबंधक लस उपलब्ध नाहीत.

4) हत्तीरोग :-

🔹हत्ती रोगांमध्ये डासांद्वारे घेतलेल्या चाव्यातून मानवी शरीरात 'व्युचेरेरिया बँक्राफ्टाय' व व्युचेरेरिया मलायी' हे कृमी उपसर्गी अळीरूपाने प्रवेश करतात. मात्र क्युलेबस जातीच्या डासांमार्फत हा प्रसार होतो. या कृमींची वाढ शरीरातील रसवाहिन्यांमध्ये होते. दोन सेंटीमीटर एवढी  वाढ होऊ शकते. यांची संतती म्हणजे मायक्रोफायलेरिया. हत्तीरोगामध्ये रसवाहिन्यांमध्ये ही कृमी जागा अडवतात व रसवहनाची यंत्रणा (लिम्फ सिस्टीम) बंद पाडतात. यामुळे शरीराच्या खालच्या भागात म्हणजेच पाय, वृषणे, मांडीचा भाग येथे सूज दिसू लागते. रससंचय झाल्याने ही सूज असते. जड वाटणे यापलीकडे वेदना नसतात.पायाला व्रण झाल्यास तो बरा होत नाही. अशा रुग्णाला डास चावल्यास त्याच्या रक्तातील मायक्रोफायलेरिया डासाच्या पोटात जाऊन त्यांची तेथेही वाढ होते. दुसर्‍या निरोगी माणसाला हा वाहक डास चावतो, तेव्हा त्याच्या सोंडेतून त्वचेवर उतरलेली उपसर्ग अळी निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करते.

🔹 हत्तीरोगावरील डायइथिल कार्बामाझाइन हे एकमेव औषध  दिले जाते. पण पूर्ण वाढलेल्या कृमींवर या हत्तीरोगाने पीडित व्यक्तीच्या लक्षणांवर त्याचा फारसा उपयोग होत नाही. संपूर्ण बाधित भागातील व्यक्तींना प्रतिबंधक म्हणून हे औषध वापरतात.

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...