Friday, 4 October 2019

नेहरु ते मोदी.. जाणून घ्या भारताच्या पंतप्रधानांच शिक्षण

📚भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत या देशाला १४ पंतप्रधान लाभले आहेत. भारतीय पंतप्रधानपदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. केवळ भारतीय नागरिकत्व आणि लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य असणे, या दोन अटींची पूर्तता भारतीय पंतप्रधानांना करावी लागते. आजवर हे पद अनेक मान्यवरांनी भूषविले आहे. भारतीय पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेचा घेतलेला हा आढावा.

👇👇👇👇

1) पंडीत जवाहरलाल नेहरू – जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी १६ वर्षे, २८६ दिवस या पदाचा कारभार सांभाळला. माजी पंतप्रधान नेहरू यांनी त्यांचे सुरूवातीचे शिक्षण भारतात घेतले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी लंडनच्या हॅरो येथे गेले. या दरम्यानच्या काळात त्यांनी ट्रिनिटी महाविद्यालय आणि केंब्रिज विद्यापीठातून मूलभूत विज्ञानाचे शिक्षण घेतले. याशिवाय, त्यांनी इनर टेम्पल या संस्थेतून कायद्याचे शिक्षणही घेतले होते.

2) लाल बहादूर शास्त्री – भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. शास्त्री यांचे माध्यमिक शिक्षण सुरू असतानाच महात्मा गांधींनी देशातील विद्यार्थ्यांना सरकारी शाळा सोडण्याचे आवाहन केले. त्यानंतर देशप्रेमाने प्रेरित झालेल्या लाल बहादूर शास्त्री यांनी असहकार चळवळीत भाग घेतला. त्यानंतरच्या काळात वाराणसीच्या काशी विद्यापीठाने त्यांना शास्त्री ही पदवी बहाल केली.

3) इंदिरा गांधी – भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधी यांनी १९८० पासून सलग तीन टर्म पंतप्रधानपद भूषविले. पंतप्रधानपदाची चौथी टर्म सुरू असताना त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांनी इकोले नोउवेले, बेक्स, इकोले इंटरनॅशनल, जिनिव्हा, प्युपिलस ओन स्कूल, पुना अँड बॉम्बे, बॅडमिंटन स्कूल, ब्रिस्टॉल, विश्व भारती, शांतिनिकेतन, कोलंबिया विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतले होते.

  4) मोरारजी देसाई – स्वतंत्र भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सेंट बुसार हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबईच्या विल्सन सिव्हिल सर्व्हिसमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले.

5) चरण सिंग – चरण सिंग फक्त १७० दिवस भारताचे पंतप्रधान होते. त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आग्रा विद्यापीठातून घेतले. त्यानंतर काही काळ चरण सिंग यांनी गाझियाबादमध्ये वकिलीही केली होती

6) राजीव गांधी – इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्याकडे देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे आली. ते भारताचे सर्वात तरूण पंतप्रधान ठरले. राजीव गांधी यांनी वेलहॅम बॉईज स्कूल आणि डून स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ट्रिनिटी महाविद्यालय, केंब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठातूनही त्यांनी शिक्षण घेतले. याशिवाय, लंडनच्या इम्पिरिअल महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

7) व्ही.पी. सिंह – विश्वनाथ प्रताप सिंह यांनी २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० या काळात देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. त्यांनी अलाहाबाद व पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले होते.

8) चंद्र शेखर – भारताचे आठवे पंतप्रधान असलेले चंद्रशेखर यांचा कार्यकाळही वर्षापेक्षा कमी राहिला. तरूण वयातच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. उत्तर प्रदेशच्या सतिशचंद्र महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले.

9) पीव्ही नरसिंह राव– भारतीय अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवणाऱ्या पी व्ही नरसिंह राव १९९१ ते १९९६ या काळात देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी आंध्र प्रदेशमधील एका लहानशा खेड्यात शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उस्मानिया विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली. यानंतर नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयातून त्यांनी कायद्यातील मास्टर्सची पदवी संपादन केली

10) अटलबिहारी वाजपेयी– अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या १३ दिवसांमध्ये सत्ता सोडली होती. त्यानंतर १९९८ मध्ये ते पुन्हा सत्तेत आले आणि त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी ग्वाल्हेर व्हिक्टोरिया महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांनी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेत विशेष प्राविण्य मिळवले. त्यानंतर कानपूरच्या डीएव्ही महाविद्यालयातून वाजपेयी यांनी राज्यशास्त्र विषय घेऊन एम.ए.ची पदवी मिळवली.

11) एच. डी. देवेगौडा– भारताचे ११ वे पंतप्रधान असलेले एच. डी. देवेगौडा यांनी कर्नाटकमधील एल. व्ही. पॉलिटेक्निक महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.

12) इंद्रकुमार गुजराल– भारताचे १२ वे पंतप्रधान असलेले इंद्रकुमार गुजराल उच्चविद्याविभूषित होते. त्यांनी बी.कॉम., एम.ए., पीएचडी आणि डिलिट या शैक्षणिक पदव्या मिळवल्या होत्या.

13) डॉ. मनमोहन सिंग– भारताला लाभलेल्या विद्वान राजकारण्यांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांची वर्णी लागते. त्यांनी पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यूफिल्ड महाविद्यालयातून मनमोहन सिंग यांनी अर्थशास्त्रातील पदवी आणि डी. फिलपर्यंतचे शिक्षण प्रथम श्रेणीसह पूर्ण केले.

14) नरेंद्र मोदी– भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी अनेक वाद असले तरी त्यांनी दिल्ली विद्यापीठातून मुक्त शिक्षण पद्धतीने कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर गुजरात विद्यापीठातून मोदींनी राज्यशास्त्र हा विषय करून मास्टर्स पदवीही मिळवली.



No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...