Sunday, 13 October 2019

जपानला 'हगिबीस' चक्रीवादळाचा तडाखा,

◾️ टोकियो : मागील 60 वर्षांमधील सर्वात शक्तीशाली चक्रीवादळाने जपानची राजधानी टोकियोच्या समुद्रकिनाऱ्यावर धडक दिली आहे. वादळादरम्यान टोकियो आणि आसपासच्या परिसरात झालेला जोरदार पाऊस आणि तुफान वाऱ्यामुळे जपानला अक्षरश: झोडपून काढलं आहे. या चक्रीवादळामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, तर 17 जण बेपत्ता आहेत. जपानी सरकारने आतापर्यंत एक लाख लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर केलं आहे.

👉फिलिपिन्स या देशात या चक्रीवादळाला 'हगिबीस' असे नाव दिले आहे. तिथल्या स्थानिक भाषेत 'हगिबीस'चा अर्थ वादळी वारे असा आहे. गेल्या सहा दशकांमध्ये असे चक्रीवादळ आले नव्हते. 1958 साली अशा चक्रीवादळाने जपानमध्ये थैमान घातले होते. त्यावेळी तब्बल 1200 हून अधिक लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. तर हजारो लोकांना बेघर व्हावं लागलं होतं. 'हगिबीस' वादळादरम्यान वारे तब्बल 216 किमी प्रति तास इतक्या वेगाने वाहत होते. त्यामुळे रस्त्यांवरील मोठी वाहनेदेखील दूरवर फेकली गेली. वादळाने टोकियोमध्ये हाहःकार उडवला आहे.

टोकियोमधल्या हवामान विभागाने 'हगिबिस' वादळाची पूर्वसूचना दिली होती. त्यामुळे सरकारने नागरिकांचे स्थलांतर सुरु केले. तसेच नागरिकांनी पाणी आणि अन्नाचा साठा करून ठेवला होता. त्यामुळे मोठी हानी टळली. दरम्यान वादळाची भिती अद्याप टळलेली नाही. टोकियो, गनामा, सैटामा, कानागावा, फुकुशिमा शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान शिझुओका भागाला 5.3 रिष्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला.

'आपण याआधी कधीच पाहिला नसेल, असा मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तयार रहा, तसेच सुखरुप राहण्यासाठी खबरदारी घ्या, असा इशारा स्थानिक हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने सांगितले आहे की, हगिबीसमुळे जपानमधील अनेक नद्यांना पूर येऊ शकतात, समुद्रकिनाऱ्यांना सर्वाधिक धोका आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलनाची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

उपाययोजना म्हणून जपानी सरकारने विमानसेवा बंद ठेवली आहे. दोन हजार विमान उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच रेल्वेसेवादेखील बंद ठेवण्यात आली आहे. चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, कारखाने, शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. तसेच लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...