Wednesday, 26 June 2024

क्ष-किरणांचा शोध

◼८ नोव्हेंबर १८९५ रोजी जर्मनीतील व्युर्झबर्ग विद्यापीठात विल्हेल्म रोंटजेन याने क्ष-किरणांचा शोध लावला. कॅथोड किरणांवर संशोधन करताना रोंटजेनला लागलेला हा शोध विज्ञानाच्या इतिहासात क्रांतिकारी शोध म्हणून नोंदला गेला आहे.

◼काचेच्या निर्वात नळीमधून उच्च दाबाचा विद्युतप्रवाह जाऊ  दिल्यास, त्यातील कॅथोडपासून (ऋण इलेक्ट्रोड) कॅथोड किरणांची निर्मिती होते.

◼ कॅथोड किरण म्हणजे प्रत्यक्षात इलेक्ट्रॉन असतात. कॅथोड किरण नळीच्या बाहेर विविध परिस्थितींत कुठपर्यंत पोहोचू शकतात, यावर रोंटजेन संशोधन करत होता.

◼हे कॅथोड किरण बेरियम प्लॅटिनोसायनाइडसारख्या प्रतिदीप्त (फ्लुओरेसन्ट) पदार्थावर पडताच, असे पदार्थ अंधारात चमकू लागतात. त्यामुळे या कॅथोड किरणांचा प्रतिदीप्त पदार्थाच्या साहाय्याने वेध घेता येतो.

◼हा प्रयोग चालू असताना, रोंटजेनला अचानक दोन मीटर अंतरावर ठेवलेली बेरियम प्लॅटिनोसायनाइडची पट्टी चमकू लागल्याचे लक्षात आले. कॅथोड किरण हवेतून इतक्या दूरवर पोहोचणे शक्य नव्हते.

◼कॅथोड किरणांची निर्मिती थांबवल्यास पट्टीचे चमकणेही थांबत होते. कॅथोड किरणांबरोबरच निर्माण होणारे हे किरण वेगळ्याच प्रकारचे किरण असल्याचे रोंटजेनने जाणले.

◼कॅथोड किरण नळीच्या काचेवर जिथे आदळत होते, तिथेच हे अज्ञात किरण निर्माण होत होते. कारण चुंबकाच्या मदतीने काचेच्या नळीतील कॅथोड किरणांची दिशा बदलल्यावर या किरणांच्या निर्मितीचे स्थानही त्यानुसार बदलत होते. प्रत्यक्ष या किरणांवर मात्र चुंबकत्वाचा परिणाम होत नव्हता.

◼रोंटजेनने त्यानंतर काचेच्या नळीतील विविध घटकांचा या किरणांवर होणारा परिणाम, तसेच त्यांची भेदनशक्ती अभ्यासली. शिशाचा अपवाद वगळता, हे किरण अनेक धातूंतून पार होत होते. हे किरण फोटोग्राफीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लेटवरही परिणाम घडवत होते.

◼जेव्हा रोंटजेनने शिशाची पट्टी दोन बोटांत धरून त्याची प्रतिमा फोटोग्राफीच्या प्लेटवर नोंदवली, तेव्हा त्याला त्या प्रतिमेत आपल्या दोन बोटांतली हाडेही स्पष्टपणे दिसली.

◼सहा आठवडय़ांच्या सखोल अभ्यासानंतर रोंटजेनने आपले हे संशोधन ‘प्रोसिडिंग्ज् ऑफ दी फिजिकल-मेडिकल सोसायटी’ या शोधपत्रिकेकडे सादर केले.

◼हे किरण ‘क्ष-किरण’ या नावे ओळखले जाऊ  लागले. कोणतीही इजा न करता शरीरातील हाडांच्या स्थितीचे दर्शन घडवणारे हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात अल्पकाळातच प्रचंड लोकप्रिय झाले. या संशोधनासाठी रोंटजेनला १९०१ सालचे- म्हणजे पहिले- नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment