◾️नवी दिल्ली : सहा वेळची जागतिक अजिंक्यपद विजेती बॉक्सर मेरी कोमची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून यंदाच्या पद्मविभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. भारतरत्ननंतर देशातल्या दुसऱ्या सर्वोच्च पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली मेरी कोम ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
मेरी कोमसह यंदा 9 महिला खेळाडूंची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यात जागतिक सुवर्णविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचं नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं आहे. स्वित्झर्लंडच्या बेसिलमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूनं पहिल्यांदाच भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. हैदराबादच्या या सुवर्णकन्येला 2015 साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.
याशिवाय क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, पैलवान विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, नेमबाज सुमा शिरुर, गिर्यारोहक ताशी आणि नुंगशी मलिक या जुळ्या बहिणींची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
36 वर्षांची मेरी कोम पद्मविभूषण पुरस्काराचा मान मिळवणारी एकूण चौथी तर पहिली महिला क्रीडापटू ठरणार आहे. याआधी 2007 साली ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद, 2008 साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सर एडमंड हिलरी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
विक्रमी सहा वेळा जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या मणिपूरच्या सुपरमॉम मेरी कोमला 2013 साली पद्मभूषण तर 2016 साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
पद्म पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या या सर्व खेळाडूंची नावं पद्म पुरस्कार समितीकडे पाठवली जाणार आहेत. त्यातून प्रजासत्ताक दिनाआधी पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात येईल.
No comments:
Post a Comment