अनुशीलन समिती : विसाव्या शतकाच्या प्रारंभीच पी. मित्र यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये कलकत्त्यास स्थापन झालेली पहिली क्रांतिकारी राजकीय संस्था. संस्थेच्या कार्याचा काही भाग उघड चाले, तर काही पूर्णपणे गुप्त असे. युवकांना शिक्षण देण्यासाठी ह्या संस्थेतर्फे मंडळे स्थापण्यात येत व त्यांत शारीरिक कवायत, हत्यारे वापरणे, घोड्यावर बसणे, पोहणे, मुष्टियुद्ध इ. प्रकार शिकवले जात. गुप्त कार्यक्रमात निवडक लोकच घेतले जात. जे प्राणार्पणाची शपथ घेत त्यांना क्रांतिकारक चळवळीचे प्रशिक्षण देण्यात येत असे.
वंगभंगाविरूद्ध झालेल्या प्रचंड चळवळीमुळे (१९०५) अनुशीलन समितीच्या कार्यास फार प्रोत्साहन मिळाले. ह्याच सुमारास अरविंद घोष, त्यांचे धाकटे बंधू बारिंद्रकुमार घोष व इतर अनेक देशाभिमानी लोक समितीच्या कार्यात सामील झाले. अध्यक्ष पी. मित्र ह्यांच्या प्रयत्नाने बंगालमध्ये समितीच्या अनेक शाखा स्यापन झाल्या. त्यातील प्रमुख शाखा डाक्का येथे पुलीनदास ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापण्यात आली. पुढे समितीत कार्यपद्धतीसंबंधी मतभेद होऊ लागले. बारिंद्रकुमार व त्यांचे तरुण सहकारी ह्यांना बाँब तयार करणे हे समितीचे आद्य कर्तव्य असावे असे वाटे, तर समितीचे अध्यक्ष पी. मित्र ह्यांचे मत तात्कालिक हिंसक क्रंतीच्या विरुद्ध होते. ह्या मतभेदांमुळे अनुशीलन समितीतच अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली ‘युगांतर समिती’ हा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.
पुढे समितीत तात्त्विक मतभेद वाढू लागले आणि त्यांतून तीन गट निर्माण झाले. डाक्का येथील पुलीनदास ह्यांचा, कलकत्त्यात पी. मित्र ह्यांचा व राशबिहारी बोस ह्यांचा असे तीन गट कार्य करू लागले; तथापि एकमेकांशी संपर्क मात्र ठेवला जात असे. आर्थिक व इतर स्वरूपाचा मदतही एकमेकांस देण्यात येई. समितीच्या शाखा सर्व बंगालभर होत्याच. त्याशिवाय आसाम, बिहार, पंजाब, संयुक्त प्रांत, मध्य प्रांत व दक्षिणेत पुण्यापर्यंतही त्या पसरलेल्या होत्या.अनुशीलन समितीच्या अंतर्गत व्यवस्थेसंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र डाक्का येथील शाखेची माहिती मिळते व त्यावरून बरीच कल्पना येऊ शकते. या समितीच्या संपूर्ण बंगालमध्ये शाखा प्रस्थापित करण्यात आल्या होत्या. त्यांतून रशियातील क्रांतिकार्याच्या धर्तीवर शिक्षण देण्यात येई. कार्यासाठी शस्त्रास्त्रे जमा केली जात व त्यांचा वापर परक्या अंमलदारावर व आपल्यातील फितूर अधिकाऱ्यांवर करावयाचा असे. द्रव्यासाठी आवश्यक तेव्हा लूटमार करणे, हाही त्यांच्या कार्यक्रमाचा भाग असे.भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासात ह्या समितीचे कार्य फारसे परिणामकारक झाले नसले, तरी तिच्या उद्दिष्टांची व मार्गांची दखल घेणे अगत्याचे आहे.
No comments:
Post a Comment