Saturday, 14 September 2019

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव - प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७४ वर्षांपुर्वी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. [ १३ सप्टेंबर १९४५] { काही पुस्तकांमध्ये ही स्थापना ८ जुलै १९४५ ला झाल्याचीही नोंद आहे} हे संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष.

● या संस्थेने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले. अनेक मान्यवरांना संस्थेकडून खूप काही मिळाले.

● विशेषत: औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून दलित [आंबेडकरी] साहित्याचे शिल्पकार म्हणता येतील अशा दिग्गजांची जडणघडण झाली. संस्थेच्या नव्या शाखा निघाल्या. संस्थेचे आकारमान वाढले. विद्यार्थी तसे प्राध्यापकांची संख्या वाढली. उपक्रम वाढले. इमारती वाढल्या.

● डॉ. बाबासाहेबांनी ते एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असतानाच आपण शिक्षण संस्था काढायची, तिचे महाविद्यालय गुणवंत-नामवंत असेल अशी उभारणी करायची असे मनाशी ठरवले होते.

● बी.ए.च्या परिक्षेत त्यांच्या वर्गात पहिल्या आलेल्या गजेंद्रगडकरांनाच त्यांनी पुढे आपल्या महाविद्यालयात पहिले प्राचार्य म्हणून नियुक्त केले.

● समाजातील खूप नामवंत आणि गुणवंत असलेल्या व्यक्तींना आपल्या संस्थेत आवर्जून बोलावून घेतले.

● प्राचार्य म.भि.चिटणीस, प्राचार्य म.ना.वानखडे, मधू दंडवते, भालचंद्र फडके, रा.ग.जाधव, वा.ल.कुलकर्णी, मे.पु.रेगे, शां.शं.रेगे, स.गं.मालशे आदींची निवड करताना त्यांनी निवडलेली माणसं किती भली होती याची खात्री पटते.

● २० जुलै १९४२ रोजी डॉ. बाबासाहेब व्हॉईसरायच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्याकडे दहा मोठया खात्यांचा कार्यभार होता. त्यांनी अनुसुचित जातींसाठी केंद्रीय नोकर्‍यांमध्ये ८.३३ टक्के आरक्षणाची तरतूद करून घेतली.

● लवकरच त्यांच्या लक्षात आले की, शिक्षणाअभावी अनुसुचित जातींमधून पात्र उमेदवार मिळायला अडचण येते. त्यांनी तातडीने शिक्षण संस्था उभारणीला सुरूवात केली.

● मंत्रालयासमोरच्या शासकीय बराकींमध्ये संस्थेचे वर्ग भरत असत. मुंबईत तेव्हा नोकरी करून शिकणार्‍या गरिब, होतकरू मुलांमुलींसाठी सकाळचे एकही महाविद्यालय नव्हते. ती उणीव बाबासाहेबांनी भरून काढली.

● फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि विनोदी लेखक बाळ गाडगीळ हे गरिब ब्राह्मण कुटुबांतले. गाडगीळ नोकरी करून शिकले ते बाबासाहेबांच्या या महाविद्यालयामुळे. यांनी आपले आत्मचरित्र बाबासाहेबांना अर्पण केलेले आहे.

● अशा असंख्य ज्ञात अज्ञातांच्या वाटचालीत पीपल्स एज्युकेशनने शिक्षणाची सावली दिली.

● बाबासाहेबांची आपला अफाट ग्रंथसंग्रह पीपल्सच्या ग्रंथालयांना दिला.

● पालीभाषा, बौद्ध संस्कृती, आधुनिक ज्ञानविज्ञान या बाबतीत ही संस्था अग्रेसर राहावी असे त्यांचे स्वप्न होते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...