Sunday, 22 September 2019

ऐतिहासिक: बॉक्सर अमितला जागतिक रौप्य

भारताचा बॉक्सर अमित पंघलची यंदाच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील घोडदौड शनिवारी रौप्यपदकासह संपष्टात आली. ५२ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये शनिवारी उझ्बेकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता बॉक्सर शाखोबिदिन झॉयरोव्हने त्याच्यावर सरशी साधत जगज्जेतेपदाचा मान संपादला. अमितने फायनलमध्ये केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा, लढतीतमधील त्याची आक्रमकता पाहून अंतिम फेरीचा ५-० हा स्कोअर फसवा वाटतो. मात्र कुस्ती आणि बॉक्सिंगमधील तांत्रिक गुणांचा थांग खुद्द खेळाडूंनाही लागत नाही.

जागतिक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारणारा, रौप्यपदकाची कमाई करणारा दुसरा सीडेड अमित पंघल हा भारताचा पहिलाच बॉक्सर ठरला आहे. त्याआधी मनीष कौशिकने ६३ किलो वजनी गटात ब्राँझपदकाची कमाई केली आहे.

अमितची उंची तशी बॉक्सरला साजेशी नाही; पण आपल्या उजव्या हाताच्या ठोश्याने तो उंचपुऱ्या प्रतिस्पर्ध्याच्यादेखील नाकीनऊ आणतो. शनिवारी पार पडलेल्या फायनलमध्येही तसेच चित्र दिसले. त्याचा प्रतिस्पर्धी झॉयरोव्ह उंचपुराच होता. तरीदेखील छोट्याचणीच्या अमितचे ठोशे अचूक लागत होते. त्यात अमितच्या तुलनेत झॉयरोव्हची शरीरयष्टीही पिळदार आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या भारताचा एशियाड आणि आशियाई विजेता बॉक्सर अमित कमीच पडला.

मुळचा रोहतकचा असलेल्या अमितने राष्ट्रीय विजेता झाल्यापासून मागे वळून बघितले नाही. २०१७मध्ये त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझची कमाई केली आणि अमितच्या आंतरराष्ट्रीय यशाचा सिलसिला सुरू झाला.

या स्पर्धेच्याआधी भारताला जागतिक स्पर्धेत एकपेक्षा जास्त पदके जिंकणे जमले नव्हते. जे अमित आणि मनीषमुळे शक्य झाले. २००९मध्ये विजेंदर, २०११मध्ये विकास क्रिशन, २०१५मध्ये शिव थापा आणि २०१७मध्ये गौरव बिधुरीने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ब्राँझपदके पटकावली आहेत.

▪️दष्टिक्षेप

१) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील ५२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत शनिवारी अमित पंघलला ऑलिम्पिक विजेत्या झोयरोव्हकडून पराभव पत्करावा लागला.

२) जागतिक कुस्ती स्पर्धेत किमान उपविजेता ठरलेला अमित हा पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे. या स्पर्धेत प्रथमच भारताला दोन पदके लाभली हे विशेष.

३) मनीष कौशिकने ६३ किलो वजनी गटात यंदा ब्राँझपदकाची कमाई केली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...