Monday, 23 September 2019

भारताचे माजी सलामीवीर माधव आपटे यांचे निधन

माजी कसोटीपटू आणि भारताचे माजी सलामीवीर फलंदाज माधव आपटे यांचे सोमवारी पहाटे सहा वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. भारताकडून सात कसोटी सामने खेळणाऱ्या माधव आपटे यांनी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

माधव आपटे यांनी मुंबई संघातून पदार्पण करत रणजी सामन्यात सौराष्ट्रविरूद्ध शतक ठोकलं होत. त्यानंतर १९५२-५३ या काळात त्यांनी सात कसोटी सामन्यात भारताच प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यावेळी पाकिस्तानविरूद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यासाठी माधव आपटे यांची भारतीय संघात निवड झाली. यावेळी त्यांनी उत्तम खेळ केला. त्यामुळे नंतर झालेल्या वेस्ट इंडिच दौऱ्यासाठीही त्यांची निवड झाली होती. पाच सामन्यांच्या मालिकेत आपटे यांनी सलामीला खेळताना एक शतक आणि अर्धशतकांसह ५१.११ च्या सरासरीने ४६० धावा केल्या होत्या.

या दौऱ्यात त्यांनी केलेली खेळी गाजली होती. वेस्ट इंडिजच्या गोलदांजाची धुलाई करत माधव आपटे यांनी १६३ धावांची खेळी केली. पाॅली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ते ठरले होते. हा विक्रम १८ वर्ष त्यांच्या नावावर होता. या दौऱ्यानंतर त्यांना पुन्हा भारतीय संघात स्थान मिळालं नाही. दरम्यान, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना त्यांनी ६७ सामन्यात ३३३६ धावा केल्या आहेत. यात सहा शतक त्यांनी झळकावली होती. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि मुंबईचे नगरपाल या दोन्ही पदावर त्यांनी काम केले होते. माधव आपटे यांनी ‘अ‍ॅझ लक वुड हॅव इट’ हे आत्मचरित्र लिहिले. या पुस्तकात “निवड समितीचे लाला अमरनाथ यांनी आपल्या वडिलांना दिल्लीतील कोहिनूर मिलच्या व्यवसायात भागीदार करून घेण्याची मागणी केली होती. वडिलांनी नकार दिल्याने आपली निवड होऊ शकली नाही,” असा गौप्यस्फोट माधव आपटे यांनी केला होता.

क्रिकेटच्या सर्व प्रकारातील गुरू अशीच त्यांची ओळख होती. त्यांनी जात, धर्म, लिंग, गरीब-श्रीमंत या भेदांपलीकडे जाऊन उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन केलं. त्यांचा स्वभावही खेळासारखीचं खिलाडूवृत्तीचा होता. त्यामुळे क्रिकेटपासून ते उद्योग क्षेत्रात त्यांचा मित्र परिवार होता. एका खेळाडू बरोबरचं यशस्वी उद्योजक म्हणूनही ते परिचित होते.

No comments:

Post a Comment

Latest post

इतिहास प्रश्नमंजुषा

०१. महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ? A. लतिका घोष ✔ B. सरोजिनी नायडू C. कृष्णाबाई राव D. उर्मिला देवी ०२. पहिल्या कर्नाटक युद्धानंतर क...