चीनमध्ये ऑनलाइन रिटेल क्षेत्र (किरकोळ विक्री क्षेत्र) गाजवणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा हे अध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत.
अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे चीनच्या उद्योगांपुढे आव्हान असताना त्यांनी अलिबाबा या ई व्यापार कंपनीचा निरोप घेतला आहे.
मा हे चीनमधील सर्वात श्रीमंत व सर्वाना परिचित असलेले उद्योजक असून त्यांनी त्यांच्या ५५ व्या वाढदिवशी हे पद सोडले आहे.
त्यांनी एक वर्षभरापूर्वीच पद सोडण्याचे संकेत दिले होते. ते आता अलिबाबा भागीदारी मंडळात सदस्य राहतील.
हा ३६ सदस्यांचा गट असून त्याला कंपनीचे संचालक ठरवण्याचा अधिकार आहे.
जॅक मा हे इंग्रजीचे माजी शिक्षक असून त्यांनी १९९९ मध्ये अलिबाबा कंपनी स्थापन करून चीनच्या निर्यातदारांना अमेरिकी किरकोळ व्यापारक्षेत्राशी सांगड घालून दिली.
नंतर या कंपनीने चीनमधील वाढत्या ग्राहक बाजारपेठेतच काम करण्याचे ठरवले, कंपनीने बँकिंग, करमणूक, क्लाउड कॉम्प्युटिंग या क्षेत्रात काम केले.
जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत १६.७ दशलक्ष डॉलर्सच्या महसुलात ६६ टक्के वाटा देशी उद्योगांचा आहे.
सध्या चीनच्या रिटेल उद्योगावर अमेरिकेबरोबरच्या व्यापार युद्धामुळे अनिश्चिततेचे सावट असून अमेरिकी आयातीची किंमत आता वाढली आहे. ऑनलाइन विक्री २०१९ च्या पहिल्या सहामाहीत १७.८ टक्क्य़ांपर्यंत घसरली असून त्यामुळे चीनच्या आर्थिक वाढीला लगाम लागला आहे.
२०१८ मध्ये ऑनलाइन विक्री २३.९ टक्के होती.
No comments:
Post a Comment