भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार
जन्मदिन - १२ ऑगस्ट, १९१९
विक्रम अंबालाल साराभाई (गुजराती: વિક્રમ અંબાલાલ સારાભાઇ) (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
बालपण व शिक्षण :-
विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात ऑगस्ट १२ १९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.
आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले.
१९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.
कारकीर्द:-
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले.
भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली.
विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.
विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली.
अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली.
No comments:
Post a Comment