Tuesday, 6 August 2019

६ ऑगस्ट १९४५ :- हिरोशिमाचा अग्निप्रलय

आजचा दिनविशेष

६ ऑगस्ट १९४५ :- हिरोशिमाचा अग्निप्रलय

६ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा या ठाण्यावर जगातील पहिला अणुबॉंब टाकला. हा बॉंब वाहून नेणार्‍या वैमानिकाचे नाव कर्नल पॉल डब्ल्यू. टिबेट्स आणि बॉंब टाकणारा मेजर थॉमस डब्ल्यू. फ़ीअरबी. अणुबॉंब म्हणजे नेमके काय? हे वैमानिक आणि प्रमुख अधिकारी पॉल टिबेट्‌स यालाही माहिती नव्हते. या अणुबॉम्ब हल्ल्यांचे सांकेतिक नाव "लिटल बॉय" असे होते. मात्र हे लिटल बॉय जपान आणि माणुसकीला खोल जखम देऊन गेला.लिटल बॉयला दुस-या महायुध्‍दाच्या वेळी अमेरिकेतील मॅनहॅट्टन प्रकल्पांतर्गत लॉस अलामोसमध्‍ये बनवण्‍यात आला होता.

किती पॉवरफुल होता 'लि‍टल बॉय'? 
जवळजवळ ४ हजार किलोग्रॅम वजनाच्या या बॉमची लांबी ३ मीटर आणि व्यास ७१ सेंटिमीटर होते. या बॉम्बने आपली विस्फोटक क्षमता युरेनियम -२३५ च्या आण्विक विखंडन प्रक्रियेतून प्राप्त केले होते. तिची विध्‍वंसक क्षमता १३-१८ किलोटन टीएनटी (ट्रायनायट्रोटालूईन) च्या बरोबरीचे होते.या महासंहारक अस्त्राचा जपानवर वापर करू नये, त्या राष्ट्राला त्याची माहिती द्यावी आणि शरण आणावे असे हे अस्त्र निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. पण, अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष ट्रूमन यांनी ते काही ऐकले नाही. अमेरिकन हवाई दलाला, जपानवर अणुबॉंब फेकायचा आदेश त्यांनी दिला.

"जपान" हे नक्की झाल्यावर कुठल्या शहरावर अणुबॉम्ब टाकायचा हे हि ठरवायचे होते. इथे तेव्हाच्या अमेरिकेचा अतिशय क्रूरपणा दिसतो. अणुबॉम्बचे नक्की काय आणि किती दुष्परिणाम होतात हे अजून जगाला माहित व्हायचे होते. या परिणामांचा "नीट अभ्यास करण्यासाठी" अशी शहरे हवी होती जिथे साधारण ३ माइल्स म्हणजे ४.८ किमीच्या परिघात नागरी वस्ती दाट आहे. अशा ठिकाणी बॉम्ब टाकल्यावर त्याची विनाशकारी क्षमता नीट अभ्यासता येईल असे त्यांचे म्हणणे होते. अणुबॉम्बचे परिणाम व्यवस्थित अभ्यासता यावे म्हणून या महत्वाच्या शहरांवरचे इतर बॉम्ब हल्ले बंद करण्यात आले. एप्रिल, मे मध्ये आधी हिरोशिमा, क्योतो, योकोहामा, कोकुरा अशी शहरे त्यांनी निवडली. नंतर पुन्हा एकदा चर्चा वगैरे होऊन २५ जुलै रोजी हिरोशिमा, कोकुरा, नीइगाता, आणि नागासाकी अशी चार शहरे नक्की करण्यात आली. कदाचित टोकियोचे नाव नसण्याचे कारण म्हणजे टोकियोमध्ये अमेरिकेचे युद्ध कैदी होते हे असावे. २ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर सगळ्यात आधी बॉम्ब टाकण्यात येण्याचे नक्की केले गेले आणि तशी 'ऑफिशिअल ऑर्डर' निघाली.

सकाळी ८:१५ मिनिटांनी "एनोला गे"ने ९४००मी उंचीवरून अणुबॉम्ब 'आइओई'च्या 'टी' ब्रिज वर टाकला.त्याचा स्फोट हिरोशिमा शहराच्या २००० फूट उंचावर झाला. जास्तीत जास्त परिणामांसाठी बॉम्ब तसा हवेतच फुटणे जरुरी होते, त्यामुळे तो तसाच तयार केला गेला होता. काही मायक्रो सेकंदातच न्युक्लीअर चेन रिअक्शन्स चालू झाल्या. फ़ार मोठा स्फ़ोट होवून ४०००० फ़ुटांवर धुराचे लोट उठत राहिले.१७० मैलांपर्यंत त्याचा धडाका जाणवला. (मुंबई ते पुणे अंतर १०० मैल आहे त्यामुळे १७० मैलाचा अंदाज यावा) बॉंब पडला त्या १ मैलाच्या परिघात एकही माणूस जिवंत राहिला नाही. माणसे उभ्या जागेवर विरून गेली. उरल्या त्या त्यांच्या सावल्या. भिंतीवर, दगडावर, आणि चपलांवर उमटलेल्या. लोखंडाचे दरवाजेच्या दरवाजे वाकले. टाईल्स, घरातली क्रोकरी, काचेच्या वस्तू चक्क वितळून एकमेकाला चिकटून गेल्या. या वस्तुंची अशी अवस्था तर माणसांचे काय झाले असेल याची कल्पनाच करवत नाही.अशा प्रकारचे अस्त्र प्रथमच वापरले गेले असल्याने नक्की काय झालेय हे ही कळत नव्हते. "अनेक बॉंब एकाच वेळेस फ़ोडले गेले आहेत" अशी भाबडी समजूत त्यांनी करून घेतली होती. लोकांनी सूर्यापेक्षा प्रखर तेजाचा गोळा फ़ुटून निघावा असा प्रकाश क्षणभर पाहिला. ३ लाख लोकांचे डोळे दिपून गेले.प्रकाश एवढा प्रखर होता की ३ लाख लोकांना त्या प्रकाशाने कायमचे अंधत्व आले.प्रकाशाची लाट सर्वत्र दिसत होती.१०००० सेंटीग्रेडची भयानक उष्णता पुष्कळांचे प्राण घेण्यास समर्थ ठरली.या भीषण लाटेचा दिड-दोनशे फ़ूट उंचीचा एक तप्त कोनच सर्वांचा पाठलाग करीत होता.एका क्षणामध्ये ६०००० लोक एकदम मरण पावले.यानंतर वार्‍याचे प्रचंड झोत सुरू झाले.या सपाट्यात सुमारे ३ लाख लोक कोलमडून पडले. या महासंहारातून वाचलेले एक लाख लोक तीन दिवसात किरणोत्सर्गाच्या आणि आगीच्या जखमांनी टाचा घासून मेले. जे जगले ते अनंत यातना भोगत मरणाची वाट पहात राहिले.

नंतर झालेल्या पावसाच्या थेंबांनी लोकांना बरे वाटले पण तोही भ्रमच ठरला.कारण किरणोत्सारी द्रव्यांनी ते थेंब विषारी झाले होते.स्फ़ोटात होरपळलेल्या लोकांनी हे काळेशार पाणी पिताच त्यांची शरीरे आतून जळाली. अग्निप्रलयापेक्षा हा ५ मिनिटांचा पाऊस अधिक भयानक होता.

मृत्यू :- ७८,१५०

बेपत्ता:- १३,९८३

जखमी:- ३७,४२४

इतर प्रकारची इजा:- २,३५,६५६

एकूण :- ३,६५,२१३

जपान्यांच मात्र कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.खरंतर जपानी मिलिटरीला हिरोशिमामधल्या स्​फोटाच्या तीव्रतेचा अंदाज यायलाही आणि बाहेरून मदत मिळायलाही काही तास गेले.पण तरी बॉम्बस्फोट झाल्यानंतरच्या काही तासात मदत कार्य वेगाने चालू झाले. हिरोशिमाताल्याच जगल्या वाचलेल्या लोकांनी रस्ते आणि दळणवळण नीट करायचे प्रयत्न सुरु केले. चक्क दुसऱ्या दिवसापासून त्यांनी काही भागातला वीजपुरवठा सुरळीत केला. स्फोटापासूनच्या तीन दिवसात शहराच्या बरयाच भागात ट्राम सर्विस चालू झाली.जिवंत असलेल्या सहकार्यांच्या अथक परिश्रमाने दुसऱ्या दिवशी 'उजीनो' नावाची एक ट्रेन लाईन चालू झाली आणि आठ तारखेला दुसरी ट्रेन लाईनही चालू झाली. या जागी पुढची ७५ वर्षे काहीही उगवणार नाही असे बोलले जात असताना ऑटममध्ये काही ठिकाणी जमिनीतून फुटलेल्या अन्कुरांमुळे लोकांच्या आशा पल्लवित झाल्या. पीस म्युझियमच्या बाहेर असलेले आसागिरीचे एक झाडही असेच आतून जळून गेलेले पण त्यालाही पालवी फुटली. या निसर्गाने केलेल्या चमत्कारामुळे लोकांना जगण्याची उमेद मिळाली. हिरोशिमामध्ये आज इतक्या वर्षांनी या घावाची कुठलीच दृश्य खुण दिसत नाही. इतकी तत्परता भारतातील राजकारणी कधी दाखवतात का?

संकलित

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...