Tuesday, 27 August 2019

बेझंट ॲनी : 🌸

(१ ऑक्टोबर १८४७ – २० सप्टेंबर १९३३).

विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण, समाजसुधारणा इ. क्षेत्रांत महान कार्य केलेली एक ब्रिटिश महिला. त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांची आई एमिली ही आयरिश होती आणि वडील विल्यम पेजवुड हेही मातृवंशाकडून आयरीशच होते. आई धार्मिक, कष्टाळू व मानी आणि वडील विद्वान, तत्त्वज्ञ व बहुभाषी होते. ॲनी बेझंट या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारल्यामुळे (१८५२) या कुटुंबापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु त्यांच्या आईच्या मॉरिएट नावाच्या एका श्रीमंत मैत्रिणीने त्यांना शिक्षणासाठी आपल्याकडे ठेवून घेतले व त्यांना जर्मन, फ्रेंच इ. भाषा व संगीत यांचे शिक्षण दिले तसेच समाजसेवेचीही आवड त्यांच्या ठिकाणी निर्माण केली. या काळात त्या वृत्तीने धार्मिक बनल्या. पुढे रेव्हफ्रॅंक बेझंट या ख्रिस्ती धर्मोपदेशकाशी त्यांचा विवाह झाला (१८६७). त्यांना दिग्बी हा मुलगा व मेबेल ही मुलगी अशी दोन अपत्ये झाली. परंतु मुलांच्या आजारपणामुळे त्या नास्तिक बनल्याने आणि पतीच्या इच्छेपुढे शरणागती पत्करणे हा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे त्यांना पतीपासून अलग व्हावे लागले (१८७३). त्यानंतर त्यांना खूप हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. त्यांच्या आईलाही या घटनेचा धक्का बसला व तिचा मृत्यू झाला (१८७४).

नॅशनल रिफॉर्मर पत्राच्या वाचनाने प्रभावीत होऊन त्या सुप्रसिद्ध नास्तिक चार्ल्झ ब्रॅडलॉ (१८३३–९१) यांच्या ‘नॅशनल सेक्युलरसोसायटी’ मध्ये दाखल झाल्या (१८७४). पुढे त्या सोसायटीच्या उपाध्यक्षा आणि सोसायटीचे मुखपत्र असलेल्या नॅशनल रिफॉर्मरच्या सहसंपादिका बनल्या. त्या काळात नास्तिकता, संततिनियमन, स्त्रियांचा मतदानाचा हक्क इत्यादींचा प्रचार केल्यामुळे त्यांचा खूप सामाजिक छळ झाला व त्यांच्यावर खटलेही भरले गेले. १८८५ साली त्या ‘फेबिअन सोसायटी’च्या सभासद बनल्या. जॉर्ज बर्नार्ड शॉ व इतर समाजवादी विचारवंतांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांनी समाजवादाचा प्रचार केला. लंडनमधील पहिल्या ट्रेड युनियन्स स्थापन करण्यास त्याच कारणीभूत झाल्या. त्यांनी काड्यापेट्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या ७०० मुलींचा संप घडवून आणला (१८८८) आणि अकुशल कामगार संघटित होऊ शकतात, हे दाखवून दिले. या काळातील बहुतेक सर्व समाजसुधारणांसाठी त्यांनी लेखनभाषणादी मार्गांनी भरीव कार्य केले.

थिऑसॉफिकल सोसायटीच्या संस्थापिका मॅडम ⇨ हेलेना ब्लाव्हॅट्‌स्की (१८३१-९१) यांचा द सीकेट डॉक्ट्रिन हा दोन खंडांत प्रसिद्ध झालेला ग्रंथ त्यांच्याकडे परीक्षणार्थ आला (१८८९). त्याच्या प्रभावाने त्यांनी ब्लाव्हॅट्‌स्की यांचे शिष्यत्व पत्करले आणि सोसायटीचे सभासदत्व स्वीकारून त्या पुन्हा आस्तिक बनल्या. १८९३ साली त्यांनी अमेरिकेस भेट दिली आणि तेथे त्यांनी शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेत अत्यंत प्रभावी भाषण करून श्रोत्यांची हृदये हेलावून सोडली.

त्या १८९३ साली भारतात आल्या आणि पुढे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या भारतातच राहिल्या. येथे त्यांनी प्रथम धर्म, शिक्षण व समाजसुधारणा या क्षेत्रांकडे लक्ष दिले. त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले. आपण पूर्वजन्मी हिंदू होतो आणि या जन्मातही जन्माने नाही, तरी श्रद्धेने हिंदू आहोत, असे त्या मानू लागल्या. त्यांनी भारतभर प्रवास करून रामायण, महाभारत, उपनिषदे इत्यादींवर अनेक व्याख्याने दिली. गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले (१९०५). भारतीयांनी आपली प्राचीन परंपरा विसरू नये, म्हणून त्यांनी भारताच्या प्राचीन श्रेष्ठत्वाचे चित्र लोकांपुढे उभे केले. त्यांनी वृत्तपत्रांतून प्रचंड लेखन केले. लेखन व व्याख्यानांतून मिळालेल्या पैशाच्या प्रचंड देणग्या दिल्या. त्यांच्या ग्रंथांची संख्या सु. ४५० आहे. त्यांपैकी काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : माय पाथ टू अथेइझम (१८७७), रॅडिकॅलिझम अँड सोशिअ‍ॅलिझम (१८८७), द एन्शंटविजडम (१८९७), एज्युकेशन अ‍ॅज अ नॅशनल ड्युटी (१९०३), अ स्टडी इन कॉन्शसनेस (१९०४), हिंदू आयडियल्स (१९०४), हिंट्‌स ऑन द स्टडी ऑफ द भगवद्‌गीता(१९०५), फोर ग्रेट रिलिजन्स (१९०६), इंट्रोडक्शन टू योग (१९०८), द रिलिजस प्रॉब्लेम्स इन इंडिया (१९०९), यूनिव्हर्सल टेक्स्ट बुक ऑफ रिलिजन अँड मॉरल्स (३ खंड, १९११-१५), सोशल प्रॉब्लेम्स (१९१२), द फ्यूचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स (१९२२), वर्ल्ड प्रॉब्लेम्स ऑफ टुडे (१९२५), हिस्टरी ऑफ द फ्रेंच रेव्होल्यूशन (१९३१). एका पाश्चात्य स्त्रीने भारतीय संस्कृतीचे मोठेपण सांगितलेले पाहून भारतीय लोक प्रभावित झाले. ते त्यांना ईश्वराचा, गार्गीचा वा सरस्वतीचा अवतार मानू लागले. सनातनी हिंदू मात्र त्यांना हिंदूंचा प्रच्छन्न शत्रू म्हणत होते.

त्यांनी बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेज काढले (१८९८) व सरकारी अनुदान न घेता ते चालविले. त्याच्याच आधारावर पुढे बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना झाली. या विश्वविद्यालयाने त्यांना सन्मान्य डी. लिट्. देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी ‘इंडियन बॉइज स्काउट्‌स असोसिएशन’ स्थापन केली (१९१७). मदनपल्ली येथे नॅशनल कॉलेज (१९१५) आणि राष्ट्रीय शिक्षणाला चालना देण्यासाठी एक संस्था (१९१७) तसेच अड्यार येथे नॅशनल युनिव्हर्सिटी (१९१८) स्थापन केली. यांखेरीज अनेक शाळा, वसतिगृहे इत्यादींची स्थापनाही त्यांनी केली. सहभोजने, बालविवाहांना प्रतिबंध, स्त्रियांची सुधारणा इ. क्षेत्रांतही त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कार्य केले. त्यांनी विमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना केली. (१९१७).

कर्नल ऑल्‌टकटच्या मृत्यूनंतर थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा म्हणून त्यांची प्रचंड बहुमताने निवड झाली (१९०७). मृत्यूपर्यंत त्याच अध्यक्षा होत्या. जिद्‌दू कृष्णमूर्ती (सध्याचे जे. कृष्णमूर्ती) या लहान मुलाला मसीहा मानून त्यांनी त्याचे शिक्षण केले (१९०९); त्याच्यासाठी ‘पूर्वतारक संघ’ स्थापन करून हेरल्ड ऑफ द स्टार हे मुखपत्र सुरू केले.

भारताच्या राजकीय नेतृत्वात १९१४ च्या सुमारास एक प्रकारची शिथिलता आली होती. यावेळी राजकीय उन्नतीशिवाय भारताची खरी उन्नती नाही, हे त्यांनी ओळखले आणि त्या राजकारणात उतरल्या. अल्पावधीतच त्या अत्यंत लोकप्रिय झाल्या. त्यांनी मद्रास येथे कॉमनवील आणि न्यू इंडिया ही दोन वृत्तपत्रे सुरू केली (१९१४). त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली (१९१६). या बाबतीत त्यांना लो. टिळकांचे सहकार्य मिळाले. महायुद्ध सुरू होताच ब्रिटिशांची अडचण तीच भारतीयांची संधी, असे त्यांनी घोषित केले. १५ जून १९१७ रोजी मद्रास सरकारने त्यांना ऊटकमंड येथे तीन महिने स्थानबद्ध केले. १९१७ सालीच भारतीय काँग्रेसच्या कलकत्त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्यांनी जहाल व मवाळ या पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढे काँग्रेसचे नेतृत्व म. गांधीजींकडे गेले. त्यांची असहकारिता व सामुदायिक सत्याग्रह ही आंदोलने अ‍ॅनी बेंझंटना मान्य नसल्यामुळे त्यांचे गांधीजींशी पटू शकले नाही. त्यामुळे १९१९ नंतर त्यांनी जवळजवळ काँग्रेस सोडल्यासारखेच केले आणि त्या राजकारणात अत्यंत अप्रिय झाल्या. त्यांना भारतासाठी स्वातंत्र्य हवे असले, तरी भारताने कॉमनवेल्थमध्ये रहावे, असे त्यांना वाटत असे.

अलौकिक वक्तृत्व, प्रकांड पांडित्य, प्रचंड कार्यक्षमता, विलक्षण स्मरणशक्ती, दीर्घोद्योग, वक्तशीरपणा, जन्माने ब्रिटिश असूनही भारतीयांविषयीची आत्मीयता, समाजाच्या उत्थानाची तळमळ इ. सद्‌गुणांमुळे त्यांचे व्यक्तीमत्त्व अष्टपैलू बनले होते. त्यामुळेच त्या ज्या ज्या क्षेत्रात गेल्या, त्या त्या क्षेत्रात अल्पावधीतच त्यांना नेतृत्त्व प्राप्त झाले.

थिऑसॉफिकल सोसायटीचे केंद्र असलेल्या अड्यार या उपनगरात त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...