Tuesday, 6 August 2019

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

​🔹

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका मितभाषी आणि तितक्यात कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे.

▪️निवडणूक न लढवण्याचा निर्णय

सुषमा स्वराज सर्वप्रथम १९९० मध्ये राज्यसभेवर निवडून आल्या. १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या. सुषमा यांनी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण व नंतर आरोग्य मंत्रालयाची धुरा वाहिली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे सांभाळली. सुषमा यांनी आपल्या ओजस्वी वाणीने जागतिक व्यासपीठांवर दबदबा निर्माण केला. संयुक्त राष्ट्रसंघातील सडेतोड भाषणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली. सोशल मीडियातून येणाऱ्या विविध तक्रारींचा त्यांनी तिथल्या तिथे निपटारा करून वाहवा मिळवली. सोळाव्या लोकसभेत सुषमा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीतून त्यांनी स्वत:हून माघार घेतली. प्रकृतीच्या कारणास्तव आपण निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. दिल्लीच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.

सात वेळा लोकसभेच्या खासदार राहिलेल्या स्वराज या वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी हरियाणाच्या मंत्रीमंडळात मंत्रीपदावर विराजमान झालेल्या.

▪️अवघ्या 25व्या वर्षी केंद्रीय मंत्रिपदाची धुरा

1977 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी सुषमा स्वराज केंद्रीय मंत्री झाल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्या कायम स्मरणात राहतील. 1977 ते 1979 दरम्यान समाजकल्याण, श्रम आणि रोजगार यासारख्या आठ खात्यांची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. त्यानंतर, वयाच्या 27व्या वर्षी त्या जनता पार्टीच्या हरियाणा प्रदेशाध्यक्ष झाल्या होत्या.

राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणूनही सुषमा स्वराज यांची आठवण येईल. त्याशिवाय, पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणूनही स्वराज यांच्या नावाची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात आहे.

देशाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी सर्वप्रथम जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर हे जबाबदारीचं पद भूषवणाऱ्या सुषमा स्वराज दुसऱ्या महिला नेत्या होत्या. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्या एकूण 11 निवडणुका जिंकल्या. त्या तीन वेळा विधानसभेवर निवडून गेल्या होत्या, तर सात वेळा खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या.

मोदी सरकार-1 दरम्यान परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी केलेल्या कामाला तर तोड नव्हती. ट्विटरवरून साद घालणाऱ्या प्रत्येकाला सुषमांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. छोट्या छोट्या गोष्टींपासून ते कुलभूषण जाधव आणि गीताच्या सुटकेसाठी मनापासून प्रयत्न केले होते. त्यासाठी देश त्यांचा कायमच कृतज्ञ राहील.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...